गोंदिया ः वाळू व गिट्टी चोरणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याच प्रकरणातील अन्य तिघेजण फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
मोहित ध्रुवराज मस्करे (वय २१, रा. ढाकणी) व योगेश मनोज चंदेल (वय २४, रा. दवनीवाडा) अशी अटकेतील, तर रानू उर्फ सूर्यकांत तिवारी (रा. पाठक कॉलनी, फुलचूर), अजय लिल्हारे (रा. ढाकणी, जेसीबी मालक), रणजीत शहारे (रा. फत्तेपूर, जेसीबी ऑपरेटर) अशी फरार आरोपींची नावे आहेत.
फुलचूरटोला येथील परमेश्वर गणेश लिचडे यांचे मालकीचे घर बांधकामाचे साहित्य सहा टिप्पर गिट्टी व १४ टिप्पर वाळू फुलचूर पेठ येथील गुरमित भाटिया यांच्या ऑफिससमोरील खुल्या जागेत ठेवली होती. दरम्यान, २९ जानेवारी ते ११ मार्च या कालावधीत गिट्टी व वाळू चोरीला गेली. याबाबतची तक्रार परमेश्वर लिचडे यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केली होती. तथापि, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल चोरी, घरफोडी गुन्ह्यांचा तपास करीत असताना गोपनीय माहितीवरून या घटनेचा उलगडा झाला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मोहित मस्करे व योगेश चंदेल यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी असता, त्यांनी गिट्टी व वाळू चोरी केल्याचे सांगितले. तसेच आरोपी रानू उर्फ सूर्यकांत तिवारी याच्या सांगण्यावरून आरोपी अजय लिल्हारे व रणजीत शहारे यांच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. आरोपींकडून वाळू व गिट्टी चोरीकरिता वापरलेले एक जेसीबी वाहन व एक टिप्पर असा एकूण ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. अटकेतील दोन्ही आरोपींना गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी धीरज राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली.