लहान भावाची हत्या करणाऱ्या मोठ्या भावाने केली आत्महत्या

0
332

यवतमाळ : मोटरसायकल वापरण्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना २८ मार्चला पुसद तालुक्यातील शेंबाळपिंप्री येथे घडली होती. याप्रकरणी पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून फरार असलेल्या आरोपी मोठ्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. मनीष जयवंत शिरपुले (२३) रा. शेंबाळपिंप्री असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या कळमनुरी (जि. हिंगोली) येथे उघडकीस आली.
मनीषने घेतलेली दुचाकी दुरुस्त करून त्याचा लहान भाऊ दिनेश शिरपुले हा वापरत होता. त्यावरून दोघा भावांमध्ये वाद होत होते. दरम्यान शुक्रवार, २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास मनीषने लहान भाऊ दिनेश याच्या डोक्यावर फावड्याने वार करून त्याची हत्या केली. लहान भावाची हत्या करून मोठा भाऊ घटनास्थळावरून पसार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी आरोपी मनीष शिरपुले याच्यावर गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली होती.
पुसद तालुक्यातील शेबांळपिंप्री हे गाव विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर आहे. या गावापासून काही अंतरवर हिंगोली तालुक्यातील कळमनुरी हे गाव आहे. या गावालगत असलेल्या कळमनुरी परिसरात त्याचे मोबाईल लोकेशन दिसत होते. त्या ठिकाणी खंडाळा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला, मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, आज सोमवारी सकाळी दिनेशची हत्या करणारा मनीष हा कळमनुरी परिसरातील एका टेकडीवर आहे, अशी माहिती खंडाळा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक कायंदे, गोपाल पांडे हे त्या ठिकाणी गेले. कळमनुरी पोलिसांची मदत घेऊन किंचाळेश्वर महादेव मंदिराच्या मागे दत्त मंदिर टेकडीजवळ पोहचले. यावेळी दिनेशची हत्या करणारा आरोपी मोठा भाऊ मनीष शिरपुले याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले.