हरविलेले १३ मोबाईल हस्तगत करुन मुळमालकांना परत

0
45

गोंदिया,दि.१०ः-जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे हरविलेल्या मोबाईलचा तांत्रीक पध्दतीने शोध घेवून 13 महागडे मोबाईल किमती 1,35,000/- रूपयांचे मुळ मालकांना  पोलीस निरिक्षक वैभव पवार यांच्या हस्ते परत करण्यात आले.

रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे महागडे मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यास प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारीचे अनुषंगाने रावणवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक वैभव पवार यांनी गंभीर दखल घेवून त्यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन करुन हरविलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने पोलीस ठाणे रावणवाडी येथील पोलीस पथकाने हरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (CEIR) या अप्लीकेशनवर हरविलेले मोबाईलचे अर्ज अपलोड करुन ठाणे हद्दीतुन वेगवेगळ्या कंपनीचे हरविलेले एकुण 13 महागडे मोबाईल शास्त्रोक्त तांत्रीकशुद्ध पध्दत व बुध्दीकौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने शोधुन काढले.मोबाईल मालकांना त्यांचे हरविलेले मोबाईल हाती परत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्दिगुणीत होवून समाधान दिसत होते.पोलीसांच्या या स्तुत्य कामगीरीचे सगळीकडेच कौतुक होत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगीरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी  रोहीणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रावणवाडीचे पो.नि.वैभव पवार, पो.शि. रजनिकांत बोपचे, तसेच तांत्रीक सेल गोंदिया येथील पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार संजू मारवाडे, योगेश रहीले, रोशन येरणे यांनी सदरची कामगिरी केली आहे.