राजोलीच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

0
146

गोंदिया,दि.११: जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजोली हद्दीतील वनविकास महामंडळच्या (एफडीसीएम) जंगल परिसरात पाथर गोटा नजीकच्या उजव्या बाजूला एका (अंदाजे ४० ) वर्षीय अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले असल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.मृत महिलेचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय पथका कडून वर्तविला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार वनविकास महामंडळ (एफ डी सी एम) कक्ष क्रमांक ३३७ येथील जंगल परिसरात लाकडी बिट तोडून व ते ट्रॅक्टर आणि ट्रक मध्ये भरून वाहतूक करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान कापलेले बिट लाकडे ट्रॅक्टर ट्रॉलीत भरण्यासाठी गेलेल्या मजुरांना त्या मृत महिलेचे प्रेत आढलून आले. या घटनेची माहिती मजुरांकरवी सबंधित वनकर्मचारी यांना देण्यात आली.वन कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनेची माहिती केशोरी पोलिसांना दिली .काही वेळातच घटना स्थळी केशोरी पोलीस आणि शव विच्छेदन करिता वैद्यकीय अधिकारी दाखल झाले. सदर महिलेचे प्रेत हे दोन दिवसांपूर्वीचे असल्यामुळे कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने केशोरी पोलिसांनी मृत महिलेचा पंचनामा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून घटना स्थळाच्या बाजूलाच मृत महिलेचे शरीर दफन करण्यात आले.