धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आरोपीला अटक

0
294
भंडारा कारागृहात रवानगी; शहरात तणावपूर्ण शांतता
गोंदिया, ता. १७ ः गणेशनगर, गोंदिया येथील एका व्यापाऱ्याने स्वतःच्या प्रतिष्ठानामध्ये धार्मिक भावना दुखावतील, असे चित्र असलेल्या टाइल्स लावल्यावरून बुधवारी (ता. १६) रात्रीला शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी वेळीच घटनेचे गांभीर्य आेळखून आरोपीला अटक केली. त्याला गुरुवारी (ता. १७) न्यायालयात हजर केले
असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. चिराग संदीप रूंगठा (वय ३५, रा. गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी चिराग रुंगठा याने स्वतःच्या दुकानात धार्मिक भावना दुखावतील, असे चित्र असलेल्या टाइल्स लावल्या होत्या. हा प्रकार एका व्यक्तीच्या लक्षात येताच त्याने चिरागला हटकले. मात्र, त्याने याकडे दुर्लक्ष केले. यावर त्या व्यक्तीने टाइल्स लावलेल्या ठिकाणाची चित्रफित काढून ती समाज माध्यमांवर प्रसारीत केली. चित्रफित प्रसारीत होताच शहरातील
काही संतप्त नागरिकांनी बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपीचे दुकान गाठून आरोपी चिराग याला चांगलाच चोप दिला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. याचवेळी नागरिकांनी गोंदिया शहर पोलिस ठाणे गाठून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आक्रोश केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी कश्यप राजाबाबा वासनिक (वय २३, रा. मरारटोली) याच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा नोंद केला. घटनेचे गांभीर्य ओळखून दंगा नियंत्रण पथक व अतिरिक्त कुमक पाचारण करण्यात आली होती. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली.
 आरोपी चिराग याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.  न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावली असून, त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांनी सांगितले. गुरुवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती.