सांगली,दि.१९ः सांगलीचे समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे (Nitin Ubale) यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. कार्यालयातील कक्षातच लाच घेत असताना उबाळे लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले. बचत गटाने घेतलेल्या निविदेचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात ते 40 हजाराची लाच घेत असताना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांना लाच लुचपत विभागाने अटक केली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे बचत गटाच्या निविदेनुसार 8 लाख 12 हजार रुपये देयक मंजुरीसाठी 10 टक्के लाचेची मागणी उबाळे यांनी केली होती. याबाबत तक्रारदारांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची नियमानुसार पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 80 हजाराची लाच मागणी करण्यात आली होती. मात्र, तडजोडीमध्ये ही 5 टक्के प्रमाणे 40 हजार रुपये ठरले. गुरुवारी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. सहायक आयुक्त उबाळे कार्यालयाच्या प्रधान कक्षामध्येच 40 हजार रुपयांची लाच घेत असताना पथकाने छापा टाकून त्यांना रंगेहात अटक केले. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार उबाळे यांच्या विरुध्द सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रायगडमधील म्हसळामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
रायगड,दि.१८ ः रायगड मधील म्हसळामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. जमिनीच्या मोजनीकरीता आकारफोड करुन देण्याकरता भुकरमापक सर्वेअरकडून 50000 हजाराच्या लाचेची मागणी शेतकऱ्याकडे केली होती. विशाल भीमा रसाळ असं लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अलिबाग मधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं विशाल भीमा रसाळ या अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पडकडलं आहे. माणगाव येथील बस स्थानकात लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली आहे.