गोंदिया,दि.१९ : बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या महिलेला मृत बाळ जन्माला आले व त्यामुळे आईसोबत वाद झाला. यानंतर कुणालाही न सांगता ती निघून आली. परंतु प्रवासादरम्यान मोबाइल हरवल्याने येथे अडकून पडलेल्या महिला व तिच्या दीड वर्षीय मुलीला रामनगर पोलिसांना तिच्या पतीच्या स्वाधीन केले. सुनीता देवीसिंग तेजावत (रा. डबरापारा-छत्तीसगड) असे महिलेचे नाव आहे. तर तिचा पती सध्या हैद्राबाद (तेलंगणा) येथे राहत आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रामनगर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलिस शिपाई विपुल नागदेवे यांना एक अज्ञात महिला दीड वर्षीय मुलीसह आढळून आली. त्या महिलेला रामनगर पोलिस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर परिविक्षाधीन महिला पोलिस उपनिरीक्षक काजल नामदे यांनी तिची विचारपूस केली. यावर तिने आपले नाव सुनीता तेजावत सांगितले. तिच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याचे व प्रवासादरम्यान मोबाइल चोरीला गेला असल्याचे सांगितले. आपला पत्ता स्पष्ट सांगत नसल्याने तात्पुरत्या निवाऱ्याकरिता ४ एप्रिल रोजी सायंकाळी सुनीता व तिच्या मुलीला सखी केटीएस रुग्णालयातील वन स्टॉप सेंटर येथे दाखल करण्यात आले.