कालव्यात आंगोळीकरीता गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

0
41

गोरेगाव,दि.२२ः शहराला लागून असलेल्या हलबीटोला येथील कटंगी मध्यम प्रकल्पाच्या कालव्यावर मित्रांसह आंघोळीसाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवार २२ एप्रिल रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.अंश दिलीप बारेवार रा. हिरडामाली ता. गोरेगाव असे मृताचे नाव आहे.

हलबीटोला येथील स्मशानभूमी परसिरातून कटंगी मध्यम प्रकल्पाचा कालवा देण्यात आला असून सद्या उन्हाळी हंगाम असल्याने कालव्यात पाणी अडविण्यात आले आहे. दरम्यान, काल, २१ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास मृत अंश बारेवार हा आपल्या चार ते पाच मित्रांसह त्या कालव्यावर आंघोळीसाठी गेला होताl यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. रात्रीपर्यंत अंश घरी न आल्याने कुटूंबीयांनी २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास गोरेगाव पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाला सुरुवात करत त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना विचारपूस केली असता मंगळवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास सदर प्रकार पुढे आला. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने सकाळी 9 ते 10 वाजताच्या सुमारास अंशचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.