चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल

0
53

गोंदिया,दि.२३ः मंदिरात चोरी केल्याच्या आरोपावरून दोन तरूणांना गावातील लोकांनी बैलबंडीला जूंपून गावात धिंड काढली. हा प्रकार १० ऑक्टोबर २०२४ च्या रात्री १०:३० वाजता घडला. मात्र या घटनेची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तब्बल सहा महिन्याने २१ एप्रिलच्या रात्री गोरेगाव पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.गोरेगाव तालुक्याच्या बोळुंदा येथील आकाश गणराज रहांगडाले (२७) व त्याचा मित्र महेश विठोबा शेंदरे यांनी पोंगेझरा शिव मंदीर, बोळूदां येथे चोरी केल्याचा गावकऱ्यांनी आरोप होता. या आरोपाला घेऊन लोकांनी त्या दोघांना १० ऑक्टोबर २०२४ च्या रात्री १०:३० वाजता गावातील पंच निर्मला राजेश राऊत, श्रीराम राऊत (५२), महेश भैय्यालाल कटरे, रामकिशोर (४५), धुरपता महेश कटरे (३८), बसंत ज्ञानीराम नाईक (४५), नन्नूप्रसाद रामप्रसाद शुक्ला (५२) सर्व रा. बोकुंदा यांच्याकडे घेऊन गेले. परंतु त्यांनी स्वमर्जीनेच त्यांना बैलबंडीला जूपा असा निर्ण दिला.. गावातील बाबूलाल वडगाये यांची बैलबंडी चिराग मेश्राम व बसंत नाईक यांनी आणली. त्या दोघांनी त्या आरोप असलेल्या दोघांना बैलबंडीला जुपले. त्यानंतर पंच व गावकऱ्यांच्या संमतीने त्यांची धिंड गावात काढण्यात आली. धिंड दरम्यान गावातील मदन भोलाराम बोपचे (५०), चिराग बंडु मेश्राम (३२), उमेश सदाराम पटले (४०), श्रीचंद जिवनलाल मेश्राम (३१) व इतर सर्व रा. बोळुदा यांनी त्यांची धिंड काढत असतांना आमच्याशी हुल्लडबाजी करीत होते. या घटनेसंदर्भात आरोपी निर्मला राजेश राऊत, रामिकशोर श्रीराम राऊत, महेश भैय्यालाल कटरेधुरपता महेश कटरे, बसंत ग्यानिराम नाईक, नन्नूप्रसाद रामप्रसाद शुक्ला, मदन भोलाराम बोपचे, चिराग बंडू मेश्राम, उमेश सदाराम पटले, श्रीचंद जीवनलाल मेश्राम यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२७ (२), १८६ (२), १८९,१८९(२), १९०, १९१, ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ केली व्हायरल अन् ताज्या झाल्या आठवणी
बैलबंडीला जुपंले त्यावेळी श्रीचंद जिवनलाल मेश्राम याने व्हिडीओग्राफी केली होती. तो व्हिडीओ २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता व्हायरल केला. गोंदियाचे प्रकरण ताजे असतांनाच हा व्हिडीओ व्हारल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.