गोंदिया : तालुक्यातील पांढराबोडी येथील एका किराणा व्यवसायिकाच्या घरी सुनामौका साधून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अटक केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 23 एप्रिल रोजी केली असून चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी चोरी गेलेला 1 लाख 66 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले. अंकेश उर्फ पांड्या मधु चव्हाण (वय 25) व अरविद छनालाल भुरे (वय 44) दोन्ही रा. पांढराबोडी, ता. जि. गोंदिया असे चोरट्यांचे नाव आहे.
सविस्तर असे की, पांढराबोडी येथील चंदनलाल ब्रिजलाल गजभिये (व्यवसाय किरणा दुकान चालविणे ) हे परिवारासह लग्नकार्याकरिता गोंदिया येथे गेले होते. मात्र, अज्ञात चोरट्यानी सुनामोका साधून 20/4/2025 चे 19.00 वा. ते दि. 21/4/2025 चे रात्री 01.00 वा. दरम्यान फिर्यादीच्या घराचे आतून कडी लावलेला दरवाजा उघडून आत प्रवेश केले. बेडरूममध्ये असलेली आलमारीचा लॉकर तोडून आलमारीतील नगदी 1,61,000/- रुपये, व सोन्याचे दागिने असा एकूण किंमती 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले. फिर्यादी यांचे तक्रारी वरून पो. ठाणे गोंदिया ग्रामीण येथे दिनांक 21/04/2025 रोजी अपराध क्र. 221/2025 कलम 305(ए ), 331 (4), भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा समांतर तपास, अज्ञात गुन्हेगार चोरट्यांचा शोध करीत होते. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे घरफोडी करणारे पांढराबोडी येथील आरोपी अंकेश उर्फ पांड्या मधु चव्हाण व अरविद छनालाल भुरे यांना गुन्ह्याचे अनुषंगाने 23/04/2025 रोजी ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले. नमूद जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींशी सखोल चौकशी विचारपूस केली असता दोन्ही आरोपीनी घरफोडी गुन्हा/ चोरी केल्याचे कबूल केले. दोघांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल रोख रक्कम 1,28,900/- रुपये व पिवळ्या धातूचे दागिने वजनी 28.1 ग्रॅम किंमती 37,500/- रुपये असा एकुण किंमती 1 लाख 66 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले. आरोपींना पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई, आरोपीना अटक, तपास प्रक्रिया गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचे निर्देश सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक, सहा पोलीस निरीक्षक- धीरज राजूरकर, पोउपनि शरद सैदाणे, अंमलदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजीत बिसेन, सुबोध बीसेन, घनश्याम कुंभलवार यांनी केली.