तुमसर,दि.२९ः तालुक्यातील मिटेवानी येथे आज मंगळवार, २९ एप्रिल रोजी बाबुजी सुशिक्षित बेरोजगार संस्था संचालित धान खरेदी केंद्रावर भीषण दुर्घटना घडली. धानाचे सुमारे १०० पोते अंगावर पडल्याने एका ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. राजु कुंभलकर यांचा ट्रक धान वाहतुकीसाठी केंद्रावर आला होता. या ट्रकवर राजेश विजय बिसने (वय ५०, रा. अभ्यंकर नगर, तुमसर) हे चालक होते. गोडाऊनमध्ये असताना अचानक धानाचे पोते त्यांच्या अंगावर कोसळले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, राजेश बिसने हे जवळपास अर्धा तास ढिगाऱ्याखाली अडकले होते.याला पुर्ण पणे धान खरेदी केंद्र जबाबदार आहे. कारण गोडाऊन मालकाला शासनाकडून स्के फुट प्रमाणे पैसे दिले जाते. आणि त्या हिसोबाने पोते ठेवायला पाहिजेत होते. परंतु पोत्यांचा मोठा ढिगारा होता, यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर दोन मजूर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत राजेश बिसने यांना दोन लहान मुली असून, एक पाचवी व एक चौथ्या वर्गात शिकत आहेत घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे कुटुंबातील ते एकमेव कमावते होते. त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास केले. वादुमल राणे मिटेवानी व भुपेंद्र धर्मराज रहांगडाले सिलेगाव यांच्यावर BNS 2023 नुसार 106,3(5) निष्काळजीपणा मुळे मृत्यूचा गुन्हा पोलीस स्टेशन तुमसर मध्ये दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खरेदी केंद्राच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यासीन छवारे यांनी मृतकाच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी धान खरेदी केंद्राकडे केली आहे.