गोंदिया,दि.10 : शहरातील घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ आॅक्टोबर रोजी पकडली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली. या आरोपीकडून ८ लाख २० हजार रूपये किंमतीचे ३२.५ तोळे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी मंगळवारी (दि.९) दिली.
रोहन अविनाश नागज्योती (१९) रा. यादव चौक गोंदिया, बबन सुरेश भागडकर (२०) रा. मरारटोली रेल्वे फाटकजवळ गोंदिया, मनिष विजय राय (२५) रा. सतनामी मोहल्ला सरकारी तलावजवळ गोंदिया व समशेर अन्सार मलीक (४१) रा.श्रीनगर गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदर आरोपींनी गोंदिया शहर, रामनगर व गोंदिया ग्रामीण या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १३ ते १४ घरफोड्या केल्याची कबुली सदर आरोपींनी दिली. ९ प्रकरणे दाखल असल्यामुळे त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. २२ ते २३ आॅगस्ट २०१८ च्या रात्री रेलटोलीच्या बापट लॉन रस्त्यावरील निखिल रूपारेल यांच्या घरून या आरोपींनी ८ लाख २० हजार रूपये किंमतीचे ३२.५ तोळ्याचे दागिणे चोरुन नेले होते. यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे आले होते. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले. स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचे १८ गुन्हे, मोटारसायकलचे ११ गुन्हे, चोरीचे ९ गुन्हे असे ३८ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. चोरीचे दागिणे विक्री करण्यासाठी आलेल्यांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी. आणि जो व्यक्ती चोरीचे दागिणे घेईल त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक बैजल यांनी सांगितले.