ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
26

 तुमसर,दि.29ः रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला सिलेंडर वाहणार्‍या ट्रकने धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना तुमसर-देव्हाडी मार्गावर शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला.
जय अनिल तोलाणी (२५) रा. गोवर्धन नगर तुमसर असे मृतकाचे नाव आहे. जय हा देव्हाडी मार्गावर रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन उभा होता. देव्हाडीकडे जाणार्‍या सिलेंडर मालवाहतूक ट्रकने जयला धडक दिली. यात दुचाकी चेंदामेंदा होऊन जय ट्रकखाली दबला गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याच मार्गाने नगराध्यक्ष प्रदीप पडोळे जात होते. अपघातस्थळी त्यांनी धाव घेतली. जयला बाहेर काढून अन्य नागरिकांच्या मदतीने आपल्या चारचाकी वाहनात घालून उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती आहे. जयला चार वर्षाची एक मुलगी असून, तो किराणा दुकान चालवित होता. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. तुमसर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे