गोंदिया,दि.27 : तिरोडा तालुक्यातील धापेवाडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातील रेती जेसीबीच्या सहाय्याने काढून टिप्परमध्ये भरणाऱ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घालून जेसीबी व टिप्पर जप्त केले. ही कारवाई २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान करण्यात आली.पोलिसांनी धाड घातली तेव्हा जेसीबीच्या सहाय्याने टिप्परमध्ये रेती भरण्याचे काम रवि बंबारे करीत होता. परंतु पोलीस आल्याची वार्ता काणी पडताच तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या वेळी टिप्पर चालक अतुल मनोज राऊत (२५) रा. निलागोंदी ता.जि. गोंदिया याला ताब्यात घेण्यात आले. त्याला वाळूच्या रॉयल्टी संदर्भात विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. सदर टिप्पर गोंदिया येथील बाबा गणी याचा असल्याचे सांगितले. जेसीबी क्रमांक एमएच १५-सीव्ही ३९७६ किंमत २२ लाख तर टिप्पर एमएच ४०-बीजी ५९७ किंमत २० लाख हे दोन्ही जप्त करण्यात आलेत. सदर घटनेसंदर्भात रवी बंभारे धापेवाडा, जेसीबीचा अनोळखी चालक, टिप्पर चालक अतुल मनोज राऊत (२५) व टिप्पर मालक बाबा गणी या चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ३४ सहकलम १०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सुखदेव राऊत, विजय रहांगडाले, लिलेंद्र बैस, भूवनलाल देशमुख, राजेश बढे, भुमेश्वर जगनाडे, चित्तरंजन कोडापे, पंकज खरवडे यांनी केली आहे.