दगडाने ठेचून युवकाची हत्या

0
677

भंडारा,दि.05ः दगडाने ठेचून युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना सावरी- राजेदहेगाव शिवारात सोमवारी (दि.४) सकाळी १0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विलास रमेश सुखदेवे (३७) रा. इंदिरानगर (जवाहरनगर/ सावरी) असे मृत युवकाचे नाव आहे.
सकाळच्या सुमारास गुराखी म्हशी चारण्यास गेला असता म्हशीने खतावरील तणस विखुरल्याने गुराख्याला एकाचा पाय दिसताच त्याने गावात घटनेची माहिती दिली. जवाहरनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले.
अज्ञात मारेकर्‍यांनी युवकाची हत्या करून मृतदेह खताच्या ढिगार्‍यात तणशीने झाकून ठेवल्याचे आढळून आले. दरम्यान, भंडारा येथील श्‍वान पथक व फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन विभाग घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळावर प्लास्टीकचे ग्लास व थंडपेयाची बॉटल आढळून आली. बाजुलास दोन मोठे दगड रक्ताने माखलेले दिसले.
विलास सुखदेवे हा कोणतेही काम करीत नव्हता. शुक्रवारी सायंकाळी घरून निघून गेला तेव्हापासून परतला नसल्याने मित्रांसोबत कुठे गावाला गेला असेल, असे त्याच्या आईने सांगितले. मात्र, नरेश शर्मा यांच्या शेतातील खताच्या खड्डय़ात त्याचा मृतदेह आढळून आला. डोके दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आले होते. मृतकाच्या आईला बोलावून कपड्यावरून ओळख पटविण्यात आली. त्याच्या हत्येमागे दोन ते तीन व्यक्ती असू शकतात, अशी चर्चा आहे. घटनास्थळाला सरपंच, पोलिस पाटील, सावरी व परसोडीचे पोलिस पाटील तसेच पटवारी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.