तिरोडा, दि.26 : एक विकसित समाज घडविण्यासाठी आधुनिक शिक्षण, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज आहे. विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावे. त्यामुळे भविष्यातील भारताचे स्वप्न साकार होवू शकेल. मात्र त्यासाठी गरज आहे की, आई-वडिलांनी परिश्रम घेवून मुलांना योग्य मार्गदर्शन करावे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी. असे मार्गदर्शन तिरोडा पंचायत समितीचे उपसभापती हुपराज जमईवार यांनी केले.
महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या वतीने गोदिया जि.प.च्या सहकार्याने जि.प. कनिष्ठ महाविद्यालय परसवाडा येथे तालुक्स्तरिय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सुरूवातीला आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले व मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सभापती कुंता पटले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिप सदस्य चत्रभुज बिसेन, डॉ.योगेंद्र भगत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी एम.डी. पारधी यांनी मांडले. संचालन एच.पी. दरोडे यांनी केले. आभार प्राचार्य डी.एम. धुर्वे यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रतिकृतींचे सादरीकरण केले.

विज्ञान शिक्षक विजय खोब्रागडे माध्यमिक गटातून प्रथम
भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील विज्ञान शिक्षक विजय आर खोब्रागडे (एमएससी, बॉटनी) यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले