स्टार्स प्रकल्पांतर्गत गोंदियातील २ शिक्षकांसह राज्यातील ५० शिक्षकांची सिंगापूर दौऱ्यासाठी निवड

0
6751

खेमेंद्र कटरे,गोंदिया दि.१९ः– शिक्षण विभागाच्या ‘स्ट्रेंथनिंग टीचिंग-लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेट्स’ (स्टार्स) प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय एक्सपोजर भेटीसाठी गोंदिया जिल्ह्यातील २ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. एक्सपोजर टूरचा भाग म्हणून राज्यभरातून एकूण ५० शिक्षक,अधिकारी व कर्मचारी सिंगापूरला भेट देणार आहेत.हे प्रशिक्षण २२ ते २७ मार्च दरम्यान होणार असून शनिवारला २२ मार्च रोजी मुबंई येथून हा गट रवाना होणार आहे.

शिक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या आंतरराष्ट्रीय एक्सपोजर भेटीचा उद्देश शिक्षकांना जागतिक शिक्षण पद्धती, शिकण्याचे अनुभव आणि २१ व्या शतकातील शैक्षणिक कौशल्ये जसे की अनुभवात्मक शिक्षण, गट अध्यापन, समस्या सोडवण्याच्या पद्धती आणि प्रकल्प-आधारित शिक्षण यांची ओळख करून देणे आहे.

या भेटीदरम्यान, शिक्षक आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण घेतील आणि सिंगापूरमधील स्थानिक शाळांचा शोध घेतील या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौऱ्यासाठी गोंदिया येथून निवडलेले २ शिक्षकामध्ये गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ.शाळा खर्राचे सहाय्यक शिक्षक नरेंद्रकुमार नत्थुलाल गौतम व आदिवासी भाग असलेल्या देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ.शाळा भागीचे सहा.शिक्षक नरेंद्र कृष्णाजी अमृतकर यांचा समावेश आहे.निवड निकषांमध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता, अध्यापनाचा अनुभव, विद्यार्थ्यांच्या विकासातील योगदान, आदिवासी भागातील सेवा आणि शिक्षणातील राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार यासारख्या घटकांचा विचार केला गेला,असल्याची माहिती देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांनी दिली.

गोंदिया येथील निवडलेल्या सर्व शिक्षकांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खर्रा(ता.गोंदिया)येथील सहा.शिक्षक नरेंद्रकुमार नत्थुलाल गौतम यांनी सदर प्रशिक्षण कालावधीत दोन दिवस  प्रशिक्षण व दोन दिवस शाळा भेट असा कार्यक्रम असल्याची माहिती दिली.जिल्ह्यातून डिजिटल व पीएमश्री शाळांतील शिक्षकांची निवड शिक्षण विभागाने केल्याची माहिती दिली.

सोबत शासनाने निवड केलेल्या शिक्षकांची नाव असलेले शासन निर्णय c74444b4-19a6-4a27-845a-0db37d0201a1