९ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज मागविले
वाशिम ,दि.२७ मार्च – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येणाऱ्या अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील इयत्ता १० वी उत्तीर्ण होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE आणि CET कोचिंगसाठी चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे.
प्रत्येक कोर्ससाठी ४० विद्यार्थी निवडले जाणार असून, ही निवड चाळणी परीक्षेद्वारे केली जाईल. त्या अनुषंगाने, सर्व शासनमान्यता प्राप्त शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळा तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा आणि EMRS शाळांमधील प्रमुखांनी आपल्या शाळेतील मार्च २०२५ मध्ये इयत्ता १० वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची नावे पाठवावी.
शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये इयत्ता ९ वीमध्ये उच्च गुण मिळवलेले (प्रथम पाच मुलगे व प्रथम पाच मुली) अशा विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला, न्यू राधिकिसन प्लॉट, महसूल भवन, अकोला येथे दि. ९ एप्रिल २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
सदर आवेदनपत्र शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, अकोला, वाशिम, बुलढाणा तसेच शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी केले आहे.