गोंदिया दि. 27: भगवान महावीर स्वामी यांचे निर्वाण वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेमध्ये श्री.महावीर मारवाडी शाळा येथील वेद पारधी व विवेक मंदिर स्कूल गोंदिया येथील हर्षीता मदनकर हिला प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. व्दितीय पुरस्कार राजस्थान कन्या विद्यालय येथील प्राची डोंगरे, राजा गोस्वामी, तृतीय पुरस्कार विवेक मंदिर स्कूल येथील स्वाती श्रीभात्रे, निकुंज शर्मा, यांना देण्यात आला. चतुर्थ पुरस्कार विवेक मंदिर स्कूल येथील गीतेश उरकुडे, निष्ठा टेंभुर्णीकर तर सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळा येथील श्रृष्टी गजभिये, श्री महाविर मारवाडी स्कुल चेतना चंद्रवंशी हीला पाचवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. गांधी म्हणाले की, भगवान महावीरांचे अनेकांतवादाचे विचार सामाजिक आणि जागतिक शांततेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. आजही जगाला ते मार्गदर्शक ठरत आहेत. या स्पर्धेसाठी राज्यातील 16 लक्ष विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये गोंदिया जिल्ह्यातील 400 विद्यार्थी सहभागी झाले.
श्री. गांधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजीत केल्या मुळे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो. शाळांनी विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. कार्यक्रमाचे आभार शालेय शिक्षण विभागाचे महेंद्र गजभिये यांनी मानले.