बेकायदेशीर शुल्क वाढीची तक्रार केल्याने विद्यार्थ्यांना चक्क शाळेतूनच काढले

0
57

भंडारा : अधिनियम २००९ अन्वये सर्व बालकांना शिक्षण घेण्याचा अधिकार असतानासुद्धा तुमसर तालुक्यातील फादर एग्नल खाजगी शाळेने बेकायदेशीर शुल्काची तक्रार केल्याने सात विद्यार्थ्यांना शाळेतून अचानक काढले.खाजगी शाळांचा मनमानी कारभार सुरू आहे.शुल्क निर्धारणासाठी समितीची स्थापना करणे गरजेचे आहे. परंतु, या कायद्याला न जुमानता व समिती गठीत न करता मनात येईल तितके शुल्क वसूल करत आहेत. त्याचप्रमाणे एनसीआरटी’ची पुस्तके लागू असतानाही आपल्या मर्जीच्या प्रकाशनाची पुस्तके विद्यार्थ्यावर लादली जात आहेत. याचा भुर्दंड पालकावर पडत आहे.

या खाजगी शाळेवर कोणाचा अंकुश आहे का? शाळा व्यवसाय झाला आहे का? प्रशासनाचा यांना आशीर्वाद आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, तुमसर रोड येथील फादर एंग्नल शाळेने सात विद्यार्थ्यांना कोणतीही नोटीस न देता अथवा कोणतेही कारण न देता अचानक शाळेबाहेर काढले आहे. याविरुद्ध शिक्षणाधिकारी माध्यमिक भंडारा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी शाळेला नोटीस पाठवून खुलासा करण्याचे म्हटले आहे. सात दिवसात मुलांना शाळेत न घेतल्यास शाळेची मान्यता काढण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियनम उल्लंघनप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित शाळेला महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ सुधारित अधिनियमाचे उल्लंघन करून तसेच शाळा स्तरावरील शाळा शुल्क निर्धारण समिती गठीत न करताच बेकायदेशीरीत्या पालकांकडून शुल्क वसूल केल्याबाबतची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आली. यासंदर्भात नोटीस बजावली असून शाळेतून बाहेर काढलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अपेक्षित आहे जर शाळेने प्रवेश दिला नाही तर नियमानुसार कारवाई करण्यात येईल आणि शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल.रवींद्र सलामे, शिक्षणाधिकारी, (माध्यमिक) जिल्हापरिषद, भंडारा.