८३२ शिक्षकांचा गृह जिल्ह्यात परतण्याचा मार्ग झाला सुकर

0
5073

गोंदिया-बिंदूनामावली पोर्टलवर अपलोड न झाल्याने गेल्या अनेक वर्षापासून इतर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांना गृह जिल्ह्यात परतण्याचा मार्गात अडचण निर्माण झाली होती. शिक्षकांनी सुद्धा यासाठी शिक्षण विभागाचे उंबरठे झिजविले, पण हा प्रश्न मार्गी लागला नव्हता. मात्र, जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांनी हा मुद्दा लावून धरीत तो मार्गी लावल्याने ८३२ शिक्षकांचा गृहजिल्ह्यात परतण्याचा मार्ग सुकर झाल्याने अनेक वर्षानंतर दिलासा मिळाला आहे. जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात शाळांची संख्या व त्या शाळांच्या पटसंख्येच्या आधारे जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये आवश्यक शिक्षकांची शिक्षक संख्या निश्चिती करण्यात आली आहे. १०० टक्के बिंदू नामावली विभागाकडून शासनाच्या बदली पोर्टलवर आता अपलोड केली आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून जिल्ह्याबाहेर नोकरी करीत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना आपल्या गृह जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्यात एकूण १०१४ प्राथमिक शाळा असून, त्यात ३५४७ शिक्षकांची पदे मंजूर असून, २७१५ पदे भरली आहेत, तर विविध संवर्गाची एकूण ८३२ पदे रिक्त आहेत. ही पदे शासनाच्या निकषानुसार भरण्याकरिता बिंदूनामावली पूर्ण असणे आवश्यक होती. ती अट पूर्ण करून शासनाच्या बदली पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. याकरिता गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती सुरेश हर्षे यांनी यांनी प्राथमिक विभागातील यंत्रणेला बिंदू नामावली पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विभागाने विहित मुदतीत आपली जबाबदारी पार पडून रोस्टर तयार केले. लगेच शासनाच्या बदली पोर्टलवर अपलोड केले आहे.

बिंदूनामावली निश्चित होऊन रोस्टर तयार करून तो बदली पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याने गेल्या अनेक वर्षांपासून इतर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ८३२ प्राथमिक शिक्षकांना गृहजिल्ह्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांचा ब्लॅकलॉग भरून काढण्यास मदत होणार आहे. सुरेश हर्षे, जि. प. उपाध्यक्ष गोंदिया