शिक्षकांना निरक्षरांच्या सर्वेक्षणाचे आणखी एक शाळाबाह्य काम..!

0
594

 गोंदिया,दि.१३ः नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी (योजना) नुकतीच सूचना जारी केली आहे.परंतु शिक्षकांकडे अनेक प्रकारची कामे असताना शाळाबाह्य मुलांच्या (Teachers illiterate survey) सर्वेक्षणाबरोबर आता निरक्षरांचे सर्वेक्षण करायचे कसे,असा प्रश्न शिक्षक संघटनांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.

केंद्र शासनाने निरक्षरांना साक्षर करण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम उपक्रम सुरू केला आहे.त्यासाठी निरक्षरांचे सर्वेक्षण केले जाते आणि त्यानंतर त्यांना साक्षर केले जाते. याबाबत ९ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्राच्या शिक्षण संचालनालयाने (योजना) शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबरच आता निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश काढले आहेत. (Teachers illiterate survey) शिक्षकांना निरक्षर व्यक्तींची नोंदणी उल्लास मोबाइल अॅपवर करायची आहे. शिवाय, अध्यापनही करायचे आहे. राज्यातील सर्व शाळांनी दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण याबरोबरच निरक्षरांचे सर्वेक्षण करावे, असे सूचनेत म्हटले आहे.

भर उन्हात परीक्षा सुरू आहे. शैक्षणिक गुणवत्ता का खालावते आहे ? याचा साकल्याने विचार करून त्याबाबत उपाययोजना करण्याची गरज मात्र याकडे सरकारच्या दुर्लक्ष असून शिक्षण विरोधी धोरणं या स्थितीला कारणीभूत असल्याचे म्हणता येईल.त्यात भरीत भर म्हणून निपुण भारत उपक्रम, याशिवाय शालेय कामकाज आणि शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षणाबरोबर हे निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण म्हणता येईल. (Teachers illiterate survey) मूळ उद्देश बाजूला सारून शासनाला काय साध्य करायचे आहे ? याविरुद्ध आवाज बुलंद करू.
– संदिप तिडके, अध्यक्ष,महा.राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया.

अशैक्षणिक कामे

अशैक्षणिक कामे कोणती याची माहिती २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयात दिली आहे. तरीही शिक्षकांना अध्यापनाऐवजी इतर कामात गुंतवले जाते, असे पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरीराम येरणे यांनी म्हटले आहे.

कोणतेही वेगळे काम दिलेले नाही : शिक्षण संचालक

शिक्षकांना कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाही. दरवर्षी शाळेत कोणते विद्यार्थी दाखल करून घ्यावेत, याबाबतचे दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण हे नियमित होतच असते.त्यासोबतच असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत.

पाचवी, आठवीच्या अनुत्तीर्णांची परीक्षा घ्यायची कधी?

पाचवी आणि आठवीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे शासन निर्देश असल्याने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या कधी, असा नवा पेच शिक्षकांपुढे आहे. शिक्षण विभागाने यंदा राज्यभरात एकसमान परीक्षा वेळापत्रक जारी केल्याने ८ ते २५ एप्रिल या कालावधीत पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा घेतल्या जात आहेत. २५ एप्रिलला परीक्षा संपल्यावर अवघ्या पाच दिवसांत १ कोटी १७ लाख विद्यार्थ्यांचा निकालही द्यायचा आहे.

पाचवी, आठवीत जी मुले अनुत्तीर्ण होतील, त्यांच्या परीक्षा, त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्ग घेणे, उपचारात्मक अध्ययन करणे ही सर्व कामे कधी करायची? अनेक योजना अंमलबजावणीसाठी शिक्षकांवर लादल्या जात आहेत.नेमके शिक्षकांनी करायचे काय? विकास कोणाचा साधायचा?असा प्रश्न शिक्षक संघटनानी उपस्थित केला आहे.