आता जुलै-ऑगस्टमध्येही देता येणार दहावी-बारावीची परीक्षा

0
46

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना आता जुलै-ऑगस्ट २०२५ मध्येही परीक्षा देता येणार आहे. यापूर्वी केवळ फेब्रुवारी-मार्च मध्ये परीक्षा देता येत होत्या. या परीक्षेसाठी ऑनलाइन नावनोंदणी अर्ज करण्यासाठी १५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. ही मुदत एक महिना असणार आहे.

दहावी आणि बारावीच्या काही विद्यार्थ्यांना शाळेतून, महाविद्यालयातून किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून परीक्षा देणे शक्य होत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी खासगी पद्धतीने अर्ज करून म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देतात. अशा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने दिलासा दिला आहे. यासंदर्भातील सर्व माहिती मंडळाच्या http://www.mahahsscboar d.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.

खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ठ होण्यासाठी फेब्रुवारी मार्च २०२५ च्या परीक्षेवेळी ज्या अटी व शर्ती निर्धारित केलेल्या होत्या, त्याच अटी व शर्ती जुलै-ऑगस्ट २०२५ च्या परीक्षेसाठी कायम राहतील. नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरायचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. नावनोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Student Corner या option चा वापर करावा असेही राज्य मंडळाने म्हटले आहे.