-आयआयटी इंदौरच्या सहकार्याने करणार विविध संशोधनकार्य
-कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी केला संशोधकांचा गौरव
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला प्रगत राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन- प्रगत आंतरविद्याशाखीय भागीदारी संशोधन (ANRF-PAIR) या कार्यक्रम अंतर्गत तब्बल ६ कोटी रुपयांपेक्षा अधिक संशोधन निधी मंजूर झाला आहे. विद्यापीठातील संशोधक या प्रकल्प अंतर्गत आयआयटी इंदौरच्या सहकार्याने विविध संशोधन कार्य करणार आहे. तब्बल सहा कोटी रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाल्याने माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी सभाकक्षात विद्यापीठातील संशोधकांचा सन्मान केला.
कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्यासह यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, प्रभारी आयआयएल संचालक डॉ. निशिकांत राऊत, आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, प्रकल्प समन्वयक डॉ. दादासाहेब कोकरे, डॉ. रिता वडेतवार, डॉ. विणा बेलगमवार, डॉ. रुपेश बडेरे, डॉ. विजय तांगडे, डॉ. उमेश पलीकुंडवार, डॉ. प्रकाश ईटनकर, डॉ. प्रवीण जूगादे, डॉ. दयानंद गोगले, डॉ. प्रमोद साळवे, डॉ. राजेश उगले यांची उपस्थिती होती. एएनआरएफ – पेअर कार्यक्रम अंतर्गत संशोधन प्रकल्प प्राप्त करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात एक मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे. विद्यापीठाने संशोधन निधी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदौर यांच्या सहकार्याने मिळविला आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने सुरू केलेल्या एएनआरएफ – पेअर कार्यक्रम अंतर्गत हा संशोधन निधी मिळाला आहे. विद्यापीठ या कार्यक्रमांतर्गत स्पोक (Spoke) संस्थेचे कार्य पार पाडत आहे.
या कार्यक्रमांतर्गत औषधी निर्माणशास्त्र विभाग, भौतिकशास्त्र विभाग, रसायनशास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग आणि मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग या विभागातील १० संशोधन प्रकल्पांना निवडण्यात आले आहे. आधुनिक साहित्याची निर्मिती, शाश्वत पर्यावरण विकास आणि ऊर्जा तंत्रज्ञान या विषयावील संशोधनासाठी हा संशोधन निधी प्राप्त झाला आहे. संशोधन निधी मिळविण्यासाठी तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आयआयटी इंदौर यांचे सहकार्य तसेच उच्च दर्जाचा प्रकल्प प्रस्ताव तयार करणे शक्य झाले. विद्यमान प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार व कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांचे संशोधन कार्याकरिता सक्रिय प्रोत्साहन मिळत आहे. पर्यावरण तसेच सामाजिक समस्या लक्षात घेत आंतरविद्याशाखीय सहकार्यातून त्याचे समाधान शोधता यावे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. एएनआरएफ – पेअर कार्यक्रम अंतर्गत संशोधन प्रकल्प मंजूर झाल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची उत्कृष्ट संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्यात भर पडणार आहे.

*मंजूर संशोधन प्रकल्प*
१) साजूक तुपातील अवशिष्ट पदार्थातून फॉस्फोलिपिड्सचे पृथक्करण व पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया विकसित करणे
प्रमुख संशोधक : डॉ. निशिकांत राऊत
सह-संशोधक : डॉ. प्रकाश ईटनकर, प्रा. किरण बाला (आयआयटी इंदौर)
२) गव्हासाठी जैवविघटनशील चिटोसान आधारित उत्पादनवृद्धी करणारे सूत्र विकसित करणे.
प्रमुख संशोधक : डॉ. रूपेश बडेरे
सह-संशोधक : डॉ. रवीन जुगादे, डॉ. हेमचंद्र झा (आयआयटी इंदौर)
३) पर्यावरणीय स्वच्छतेसाठी डीप युटेक्टिक सॉल्व्हेंट्सवर आधारित मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क्स.
प्रमुख संशोधक : डॉ. विजय तांगडे
सह-संशोधक : डॉ. रवीन जुगादे, प्रा. रजनीश मिश्रा (आयआयटी इंदौर)
४)पिकांमध्ये पोषणद्रव्य शोषण वाढविण्यासाठी नॅनो-कॉम्पोझिट्स आधारित तंत्रज्ञान विकसित करणे.
प्रमुख संशोधक : डॉ. दयानंद गोगले
सह-संशोधक : प्रा. प्रमोद साळवे, डॉ. विवास दत्ता (आयआयटी इंदोर)
५)मणक्याच्या दुखापतीवर उपचारासाठी ३डी प्रिंटेड हायड्रोजेल स्कॅफोल्ड विकसित करणे.
प्रमुख संशोधक : डॉ. दादासाहेब कोकरे
सह-संशोधक : डॉ. वीणा बेलगमवार, प्रा. धिनाकरन शन्मुगम (आयआयटी इंदौर)
६) मेंदूच्या दुखापतीसाठी एनएससी समृद्ध कोलाजेन-PEDOT:PSS हायड्रोजेल स्कॅफोल्ड विकसित करणे.
प्रमुख संशोधक : डॉ. राजेश उगले
सह-संशोधक : डॉ. रीता वडेतवार, प्रा. एस. धिनाकरन (आयआयटी इंदौर)
७) ऊर्जा संचयासाठी बायोमासमधून तयार होणाऱ्या नेक्स्ट जनरेशन कार्बनचा विकास करणे.
प्रमुख संशोधक : डॉ. अभय देशमुख
सह-संशोधक : डॉ. उमेश पलिकुंडवार, प्रा. आर. कैलाशम (आयआयटी इंदौर)
८)इंफ्लेमेटरी बाउल डिसीजसाठी एरिओसेमॅटिन E आधारित ३डी प्रिंटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम विकसित करणे.
प्रमुख संशोधक : डॉ. सत्येंद्र प्रसाद
सह-संशोधक : डॉ. राजेश उगले, डॉ. एस. जानकीरामन (आयआयटी इंदौर)
९)कमी तापमान असलेल्या सिरॅमिक इंधन पेशींकरिता अत्याधुनिक इलेक्ट्रोलाइट्स
प्रमुख संशोधक : डॉ. स्मिता आचार्य
सह-संशोधक : डॉ. विजय तांगडे, डॉ. सत्यनारायण पटेल (आयआयटी इंदौर)
१०) सोडियम आयन बॅटरीसाठी कोबाल्ट-मुक्त कॅथोड मटेरीअल्सचा विकास करणे.
प्रमुख संशोधक : डॉ. उमेश पलिकुंडवार
सह-संशोधक : डॉ. अभय देशमुख, डॉ. प्रवर्तना धनपाल (आयआयटी इंदौर)