शासनाच्या पालक शिक्षक फी निधार्रण समितीला प्रशासनाचा ठेंगा
शिक्षण विभागाचेही दुर्लक्ष
पाल्यांचे नाव काढणार : साकेत स्कूलवर धडकले संतप्त पालक$
गोंदिया : शालेय शुल्कात सुमारे पाच हजार रूपयांची फी वाढ करण्यात आल्याने खवळलेल्या पालकांनी येथील साकेत पब्लिक स्कूलमध्ये धडकून फी वाढीचा विरोध दर्शविला. यावेळी झालेल्या चर्चेतही शाळा संचालकांनी आपला निर्णय मागे न घेतल्याने ५० हून अधिक पालकांनी १०० हून अधिक विद्यार्थ्यांची टिसी काढण्यासाठी अर्ज दिला. विशेष म्हणजे पालकांची रविवारी आणखी एक बैठक होणार असून त्यात इतरही पालकांना सहभागी केले जाणार आहेत.
साकेत पब्लिक स्कूल व्यवस्थापनासह गोंदियातील इतरही शाळांकडून दरवर्षी अशाच प्रकारे शुल्क वाढ केली जाते. मात्र यावर्षीच्या फी वाढीने साकेत स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे शुक्रवारी (दि.३) पालक आक्रमक होऊन एकित्रतपणे शाळेवर गेले. एकत्र आलेल्या पालकांनी फी वाढीचा विरोध करीत शाळा संचालक चेतन बजाज यांच्यासोबत चर्चा करून त्यांना फी वाढ मागे घेण्याची मागणी केली. मात्र बजाज यांनी पालकांच्या मागणीला धुडकावून लावत फी वाढ मागे घेणार नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर पुढच्या वर्षीही फी वाढ केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे पालकांत चांगलाच शाळा व्यवस्थापनाविरोधात चांगलाच रोष पसरला आहे.
या चर्चेत डॉ. हरेश बजाज, अनिल पशिने, राजकुमार दुसेजा, सुनिल दुनेजा, सुरेश संतानी, प्रवीण शर्मा, देवीदास नोतानी, भगतराम पुगवानी, सुनील गोलानी, चंद्रकुमार मोटवानी, अरविंद राजवानी, संजय गौतम, विवेक पराते, डॉ.शशिकांत भादुपोते, नारायण बावनकर, कीर्ती गलोले, मंजुषा अनंतवार, मधू खटवानी, सरिता चावला, नितू मुलचंदानी, सिमरन ममतानी यांच्यासह मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते.
फी वाढीच्या विषयावरून झालेल्या चर्चेत पालकांनी शाळेत दरवर्षी होत असलेली फी वाढ अन्यायपूर्ण व अवैध असल्याचे सांगत आपला विरोध व्यक्त केला. पालकांनी अन्य शाळांमध्ये दोन वर्षांत १० टक्के फी वाढविली जात असल्याचे सांगितले. यावर बजाज यांनी फी वाढ मागे घेतली जाणार नसल्याचे तसेच पुढच्या वर्षीही फी वाढ होणार असल्याचे स्पष्ट केले. बजाज यांच्या या भूमिकेने संतापलेल्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या ५१ पालकांनी टिसी काढण्याचे अर्ज शाळेला दिले आहेत.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात फी वाढविली जाते. यंदा सुमारे पाच हजार रूपये फी वाढ करण्यात आली. शाळेतूनच सर्व साहित्य घेणे बंधनकारक असून ते महागडे असतात. अशात दरवर्षीची फी वाढ परवडणारी नाही.कधी डी.जी.क्लास, स्विमींग पूल व नवनवीन उपक्रमांच्या नावावर पैसे घेतले जातात. दोन-चार दिवस त्यांचे हे उपक्र म चालतात. मात्र त्याचा भुर्दंड पालकांना बसतो.