महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून प्रशंसा
रत्नागिरी, दि.5 : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंतसाहेबांच्या संकल्पनेतून झालेली विकासात्मक कामे, ही पर्यटन स्थळे रत्नागिरीची वैभव वाढविणारी आहेत, अशा शब्दात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज प्रशंसा केली.
मंत्री आदिती तटकरे यांनी रत्नागिरीतील हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण, रत्नदूर्ग किल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेली शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराज पुर्णाकृती पुतळा, विठ्ठल मूर्ती आणि थिबा पॅलेस येथील थ्रीडी शो भेट देवून पाहिला. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, ॲड देवेंद्र वणजू, माजी नगरसेवक बिपीन बंदरकर, माजी जि.प. सदस्य दिशा दाभोळकर, अबूशेठ ठसाळे आदी उपस्थित होते.
हे सर्व पाहिल्यावर समाधान व्यक्त करुन त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजितदादा, खासदार तटकरेसाहेब यांच्याकडून उद्योगमंत्री सामंतसाहेबांनी केलेल्या या कामांबाबत खूप प्रशंसा ऐकली होती. त्यामुळे हे सर्व पाहण्यासाठी मी आज खास येथे आले. विविध लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघामध्ये विकासात्मक काही वेगळी कामे करत असतात. त्यामधून वेगवेगळ्या संकल्पना मिळत असतात. मलाही माझ्या मतदारसंघामध्ये कामे करताना येथून नवी संकल्पना घेवून जाता येईल. रत्नागिरीमध्ये सामंतसाहेबांनी केलेल्या कामांबाबत मलाही कुतुहल होते. या सर्व कामांमुळे निश्चितच शिवभक्त, पर्यटक यांची संख्या वाढणार आहे.
तारांगणमधील प्रतिकृतींचे दालन भावले
रत्नागिरीमध्ये पाहण्यासाठी पर्यटकांना कुठे काय आहे, पर्यटकांनी ते पाहण्यासाठी कुठे जावे अशा सर्व वैशिष्ट्यपूर्ण स्थळांच्या प्रतिकृतींचे एक स्वतंत्र दालन तारांगणमध्ये उभे केले आहे. ते मला भावले. निश्चितच येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ते मार्गदर्शक आणि ती पाहण्याविषयी पर्यटकांचे कुतुहल वाढविणारे ठरतील. ही सर्व पर्यटन स्थळे रत्नाकगिरीची वैभव वाढविणारी आहेत. हा सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जेवढी शासनाची जबाबदारी आहे, तेवढीच येथे येणाऱ्या पर्यटकांची, नागरिकांचीदेखील आहे, असे आवाहन करुन मंत्री आदिती तटकरे यांनी उद्योगमंत्र्यांचे, सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.