मुंबई: कांदिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकांच्या बाहेर गेले २५ वर्ष देहविक्री व्यापार सुरु आहे. त्यामुळे अनेकांना याचा नाहक त्रास होतो. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी देहविक्री करु नका, या वेश्या व्यवसायातून बाहेर पडा, समाजात सन्मानाने जगण्याची आणि पोट भरण्याची सोय समाजामार्फत मी करीन, असे भावनिक आवाहन केले आहे. कांदिवली स्थानक परिसरात अशा आशयाचे होर्डिंग झळकले आहेत. शेट्टी यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
एकीकडे मुंबई समाज सेवा शाखा देहविक्रीचे अड्डे उध्द्वस्त करत आहे. तर दुसरीकडे कांदिवली स्थानक पश्चिमेला देहविक्री व्यवसाय सर्रास सुरु आहे. कांदिवली परिसरात सुरु असलेला हा देहव्यापार बंद व्हावा, याकडे १० दहा हजार सह्यांची मोहिमही स्थानिकांनी राबवली होती. अनेकदा सामाजिक संस्थांनी याविरोधात आवाजही उठविला. तरीसुध्दा हा प्रश्न सुटू शकला नाही. कांदिवली परिसरात मोठ्या संख्येने बार आहेत, त्यामुळे या महिला बारभोवती, सार्वजनिक ठिकाणी रेंगाळत असायच्या. अनेकदा काही सामान्य महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे खासदार शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे.
कांदिवली स्थानकांपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर कांदिवली पोलीस ठाणे आहे. या व्यवसायाची जाणीव पोलिसांना आहे, मग कारवाई का करत नाही, असा सवाल शेट्टींनी केला आहे. या महिलांना भावनिक आवाहन करत असताना नागरिकांना आणि त्यांच्यासोबत मला रस्त्यावर आंदोलनासाठी प्रवृत्त करु नका, असा इशाराही शेट्टींनी दिला होता. या आवाहनाला बार मालकांनी आणि स्थानिकांनी पाठिंबा दर्शवला आहे.