
मुंबई, दि. 3 : राज्यात नाशिक, अमरावती, औरंगाबाद, पुणे या विभागात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जळगाव, बीड, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा या जिल्ह्यामधील 129 गावांमध्ये 1978 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे व गारपीटीमुळे 842 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. दोन्ही मिळून एकूण बाधित क्षेत्र 2820 हेक्टर इतके आहे. शेती पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
शेतीपिकांच्या नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज असून कृषी विभाग व महसूल विभाग यांच्याकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.इतर जिल्ह्यांमध्येही अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे करुन ते पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी विधानसभेत निवेदन सादर करताना सांगितले.