*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय भीम पदयात्रेतून सामाजिक समतेचा संदेश*



*लातूर, दि. 13 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी लातूर जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जय भीम पदयात्रेला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या यात्रेत सहभागी होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावरून उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ आणि उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या हस्ते झेंडी दाखवून पदयात्रेला सुरूवात झाली.
तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, मधुकर ढमाले, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा. संदीप जगदाळे यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, नागरिक यावेळी उपस्थित होते. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पदयात्रेमध्ये दयानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, राजस्थान शाळेचे झांज पथक यासोबतच माऊंट लिटेरा स्कूलचा आकर्षक चित्ररथ सहभागी झाला होता. ‘शिका संघटित व्हा…’, ‘ज्ञान हेच खरे सामर्थ्य’, ‘वाचाल तर वाचाल’ यासारखे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लिहिलेले फलक घेवून विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘जय भीम, जय भारत’च्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर भीममय झाला होता.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचा संदेश देणारे विचार नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जय भीम पदयात्रा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी व्यक्त केला. तसेच पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला. हा संदेश प्रत्येकाने आत्मसात करावा, तसेच समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत हा संदेश पोहचवला जावा, असे उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यावेळी म्हणाल्या.प्रारंभी शाहीर धम्मपाल सावंत यांच्या पथकाने भीम गीतांमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. या गीतांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला. एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट अँड गाईडसह विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी व उपस्थित होते.
