लातूर जिल्ह्याला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात तीन पुरस्कार

0
26
लातूर, दि. २१ : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाचा उद्देश प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नागरिकांना जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करणे आणि प्रशासनात नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवणे हा आहे. या अभियानांतर्गत सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांसाठीचा पुरस्कार वितरण समारंभ आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यामध्ये लातूर जिल्ह्यातील तीन उपक्रमांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कौशल्य विकास,उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार निवडीसाठी कार्यालयीन व्यवस्थापनात आधुनिक संकल्पना आणि व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब, सेवांची गुणवत्ता आणि दर्जा यामधील सुधारणा, उपक्रमांची परिणामकारकता, लोकाभिमुखता, ई-गव्हर्नन्स, संसाधनांचा कार्यक्षम वापर, तक्रारमुक्त कार्यालय, तसेच नाविन्यपूर्ण आणि पथदर्शी संकल्पना, प्रयोग आणि उपक्रम यांचा विचार करण्यात आला.
सन २०२३-२४ चे पुरस्कार
निलंगा नगरपरिषदेने इमारतीमध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केल्याबद्दल तत्कालीन मुख्याधिकारी गजानन शिंदे यांना विभागीय स्तरावरील निवड समितीच्या प्रस्तावांमधून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट कल्पना आणि उपक्रम या संवर्गात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नगरपरिषद प्रशासनाचे तत्कालीन जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांच्या ‘सीड बँक’ उपक्रमाला मिळाला. हा उपक्रम वृक्ष संगोपन आणि संवर्धनासाठी राबवण्यात आला होता.
सन २०२४-२५ चा पुरस्कार
लातूर जिल्हा परिषदेने ‘खेलो लातूर’ उपक्रमांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये सुसज्ज क्रीडांगणे तयार केली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान २०२४-२५ अंतर्गत सर्वोत्कृष्ट कल्पना आणि उपक्रम या संवर्गात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि गट विकास अधिकारी संतोष माने यांनी स्वीकारला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून ‘खेलो लातूर’ उपक्रम सुरू झाला असून, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो यांसारख्या खेळांसाठी क्रीडांगणे तयार करण्यात आली.
*****