· मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुच राहणार
· विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
· कार्यालयीन स्वच्छतेवर भर द्यावा
· विमानतळ धावपट्टीसाठी जागा शोधा
परभणी, दि. 26 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यशासन पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास कामे वेगाने व गुणवत्तापूर्ण करण्यास प्राधान्य देत आहेत. या विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करताना ती मुदतीत व दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व कार्यान्वयीन यंत्रणा प्रमुखांना आज आयोजित आढावा बैठकीत दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार संजय जाधव, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, आमदार सर्वश्री डॉ. राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी उपस्थित होते.
राज्यशासन नागरिकांना विकासकामांच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यशासनाच्या तिजोरीतून विकासकामांना दिला जाणारा निधी यापुढेही कमी पडणार नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने शासनाच्या योजनांची योग्य आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा गैरवापर झाल्यास अजिबात खपवून घेतले जाणार नाही. जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधा निर्माण करताना त्यांचा दर्जा राखा. कंत्राटदारांना वेळेत निधी दिला तरच दर्जेदार कामे होतील, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामे वेळेत पूर्ण करावीत. असे सांगून परभणी शहर आणि कार्यालयातील स्वच्छतेवर भर द्यावा. कारण या 100 दिवसांच्या कामांची तपासणी त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुच राहणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून ही योजना बंद होणार नसल्याचे श्री. पवार यांनी निक्षून सांगताना लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, गरजू आणि पात्र लाडक्या बहिणींनाच हा निधी मिळेल, याची दक्षता घ्यावी.
गतवर्षी जिल्ह्यात मुबलक पाऊस पडला होता. यंदाही चांगले पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला असल्याचे सांगून पाऊस पडेपर्यंत एप्रिल, मे या महिन्यात पाणीपट्टी थकबाकी वसुली करताना नागरिकांना जास्त ताण न देता पिण्याचे पाणी देण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश श्री. पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच जिल्ह्यात चारा व पाणीटंचाई प्रश्न उद्भवणार नाही, याची काळजी घेताना उन्हाळ्यात कोणतीही चारापाण्याची अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच वाडी, वस्ती तांड्यांवर मागणी आल्यास तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी-तहसीलदारांना दिले.
शासनाच्या ॲग्रीस्टॅक या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सांगताना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांनी यावर विशेष लक्ष देण्यास सांगितले. तसेच नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अनुदान, शेतकरी आत्महत्या आढावा त्यांनी घेतला. तसेच गाव नमुना -8 प्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंद रस्ते, शेतरस्ते, शिवार रस्ते मोकळे करण्याच्या सूचना करताना रामटेक विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसारखी कामे करावीत. त्यासाठी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
सौरऊर्जा हा राज्य शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही श्री. पवार यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल आवास योजनांना लागणारी 10 टक्के रेती महसूल विभागाने मोफत उपलब्ध करून द्यावी. तसेच इतर बांधकामांना लागणाऱ्या रेतीला टप्प्याटप्प्याने क्रशसँडचा पर्यायी वापर वाढविण्याच्या सूचना केल्या.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या स्वस्त धान्याचे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे वितरण डीबीटीद्वारे करण्यासाठी आवश्यक सर्व्हे 30 जूनपर्यंत 100 टक्के पूर्ण करावे. तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचीही अंमलबजावणी करण्यास सांगितले. धान्याचे वितरण उशिराने होणे, ही गंभीर बाब असल्याचे सांगून त्यात तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.
उपचारापासून कुणी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील कुणीही उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना श्री. पवार यांनी केली. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष कक्षाची स्थापना केली असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाची पदभरती ही गुणवत्तेवरच व्हावी. गरज पडल्यास पदभरतीची प्रक्रिया पुन्हा राबविण्याची सूचना संबंधित विभागाला केली.
विमानतळासाठी जागा शोधा
परभणी जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागास असून येथे उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी परभणी येथे विमानतळ धावपट्टीसाठी जागा शोधण्याची सूचना श्री. पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
बसस्थानक परिसर स्वच्छ करून तिथे पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याच्या विभागीय नियंत्रकास सूचना दिल्या. पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा विकास करताना पुण्यातील चाफेकर स्मारक, साईबाबा संस्थानाच्या धर्तीवर कामे करण्याचे निर्देश दिले.
प्रादेशिक पर्यटन योजनेतून सायन्स पार्कसाठी मंजूर निधीबाबत त्यांनी माहिती घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कामात कोणतीही दिरंगाई न करण्याच्या सूचना दिल्या. ताडकळस-सिंगणापूर येथील उड्डाणपूल बांधकाम, न्यायालयीन इमारत बांधकाम, ताडकळस धानोरा येथील नदीवरील पुलाचे बांधकाम, येलदरी येथील पुर्णा नदीवरील पुलाचे बांधकाम, परभणी पोलीस वसाहत बांधकाम, मागेल त्याला सौर कृषिपंपाचा आढावा श्री. पवार यांनी घेतला. सायबर गुन्ह्यांवर विशेष लक्ष देण्याबरोबरच गुन्हेसिद्धीसाठी एआयचा वापर करावा. अशी सुचनाही त्यांनी केली
जिल्हाधिकारी श्री. गावडे व पोलीस अधीक्षक यांनी श्री. परदेशी यांनी सादरीकरणाव्दारे यावेळी सविस्तर माहिती दिली. बैठकीच्या प्रारंभी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. बैठकीस सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.