नवी दिल्ली:-जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानशी संबंधित सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतला आहे. तसे आदेश गृह मंत्रालयानं दिलेले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. तुमच्या तुमच्या राज्यांमधील पाकिस्तानी नागरिक शोधा आणि त्यांना मायदेशी पाठवा, अशा सूचना शहांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
२२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जण मारले गेले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल समझोता करार स्थगित करण्यात आला आहे. याबद्दलचं औपचारिक पत्र भारताकडून पाकिस्तान सरकारला पाठवण्यात आलं आहे. यानंतर आता पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेला व्हिसा रद्द केला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीची बैठक झाली. त्यामध्ये अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. त्यात सिंधू जल समझोता स्थगित करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १९६० मध्ये सिंधू जल सामंजस्य करार झाला. त्यावेळीच तो लागू करण्यात आला. सिंधू नदी पाकिस्तानसाठी लाईफ लाईन आहे. जवळपास २१ कोटींहून अधिक लोकसंख्येच्या पाण्याची गरज सिंधू नदी आणि तिच्या चार उपनद्या पूर्ण करतात. त्यामुळे सिंधू नदी पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाची आहे. भारत सरकारनं अटारी सीमा बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना याच मार्गानं परत जाण्यासाठी १ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या पाकिस्तानी सुरक्षा सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांना १ आठवड्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. दोन्ही उच्चायुक्तालयातील तैनात कर्मचाऱ्यांची संख्या ५० वरुन ३० आणण्यात आली आहे.