नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.13- भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या ‘आजके शिवाजी, नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून सुरू झालेला वाद चांगलाच वाढला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरून भाजपवर टीकास्त्र केले. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली तसेच, जय भगवान गोयल यांच्या फोटोला चपलेने मारणे आणि काळे फासण्यासारखे प्रकारही घडले. त्यानंतर आता भाजपने पुस्तक मागे घेण्याचे ठरवले आहे. भाजप नेते श्याम जाजू यांनी प्रकाशकांना पुस्तक मागे घेण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.त्यातच महाराष्ट्रातील सोलापूर,चंद्रपूर जिल्ह्यातही लेखकाविरुध्द तक्रार नोंदविण्यात आली आहे.संभाजी ब्रिगेडनेही निषेध नोंदविला आहे.
‘प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे’
दरम्यान, भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकावरुन राज्यात राजकारण चांगलेच तापले. भाजपवर सर्वत्र टीका होत आहे. यातच पुस्तकाचे लेखक म्हणजेच जय भगवान गोयल यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ” प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे आणि लिहीण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाजी महाराजांचा मीही सन्मान करतो. महाराजांच्या वंशजांनीही आणि इतर लोकांनी हे पुस्तक वाचावे, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील,” असे मत गोयल यांनी व्यक्त केले.
काँग्रेसची पोलिसांत तक्रार
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत असून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. आता याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पोलिसांत भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या पुस्तकाच्या लेखक, प्रकाशक तसेच विमोचकावर तातडीने कारवाई करावी. तसेच यावर बंदी घालावी अशी मागणी करत नागपूरमधील नंदनवन पोलिस ठाण्यात करण्यात आली.
महाराजांच्या वंशजांनी राजीनामा द्यावा- संजय राऊत
शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत चांगले तापले आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचे वशंजांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “सातारा, कोल्हापूरमधील राजे हे सर्व भाजपमध्ये आहेत. भाजपचे खासदार,आमदार आहेत. सातारा आणि कोल्हापूरच्या गादीचा देशाला आदर आहे. मात्र मोदींची छत्रपतींशी तुलना हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या वादानंतर महाराजांच्या वंशजांनी राजीनामा द्यायला हवे होते,” असे राऊत म्हणाले.
महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी नाही- अशोक चव्हाण
“छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्य अतुलनीय आहे. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी त्याला महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करता येणार नाही,” असे ट्विट करत अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.