दुबई: इंडियन हायस्कूलमध्ये शिकणारी एक भारतीय मुलगी ८० भाषांमध्ये गाणी गाऊ शकते. आता एक विशेष कार्यक्रम घेऊन ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविणार आहे. दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षांची सुचेता सतीश ही मुलगी २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या एका कन्सर्टमध्ये ८५ भाषांमध्ये गाणी म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. ती सध्या ८० भाषांमध्ये गाणी गाऊ शकते आणि हे तिने केवळ एका वर्षात शिकले आहे, असे सुचेताने म्हटले आहे. विक्रमाचा हा प्रयत्न करण्यापूर्वी ती आणखी पाच भाषांतील गाणी शिकणार आहे. सुचेता ही मूळ केरळची असून ती हिंदी, मल्याळम व तमीळ अशा भारतीय भाषांमध्ये पूर्वीपासून गाणी गात होती. शाळेतील स्पर्धांमध्ये तिने इंग्रजी गाणी म्हटली आहेत. मात्र, गेल्या वर्षी तिने परदेशी भाषांतील गाणे गाण्यासही सुरुवात केली. परदेशी भाषांमध्ये माझे पहिले गाणे जपानी भाषेत होते तर फ्रेंच, जर्मन आणि हंगेरियन भाषांमध्ये गाणे सर्वांत अवघड होते, असे सुचेता म्हणते. एका कार्यक्रमात सर्वाधिक भाषांमध्ये गाणी म्हणण्याचा विक्रम सध्या केसीराजू श्रीनिवास यांच्या नावावर आहे. त्यांनी ७६ भाषांमध्ये गाणी म्हटली होती.