राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी मिळवले स्थान, भंडारा जिल्ह्यात पवनीचा गौरव

0
25
पवनी-गडचिरोली येथे जिल्हा क्रीडा संकुलात नागपूर विभागीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या स्पर्धेत १४, १७, आणि १९ वर्षांखालील वयोगटांतील मुला-मुलींच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या स्पर्धेत नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांसह नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांतील संघांनी आपापल्या जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून भाग घेतला. तिन्ही वयोगटांतील प्रत्येकी ८ संघांनी आपला जलवा दाखवला. या कठीण स्पर्धेत १७ वर्ष्याखालील वैनगंगा विद्यालय, पवनीच्या (नव विदर्भ क्रीडा मंडळ, पवनी) खो-खो संघाने तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून नागपूर विभागातही यशाचे परचम फडकवले आणि राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले.
या यशाने पवनी शहराचे नाव उज्वल केले असून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. खेळाडूंना पवनीतील नागरिक आणि विविध संघटनांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत देखील भंडारा जिल्ह्याचे नाव उंचावण्याचे स्वप्न या खेळाडूंनी दाखवले आहे.
वैनगंगा विद्यालयाच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू दिलराज सिंग सेंगर यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन मिळाले आहे. या यशाबद्दल वैनगंगा विद्यालयाचे सचिव गणेश तार्वेकर, प्राचार्य पराज टेम्बेकर तसेच नव विदर्भ क्रीडा मंडळाचे संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, श्रेयश कुर्झेकर, निखिल शहरे, आणि चेतन गेडाम यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यस्तरीय स्तरावर आपली कौशल्ये दाखवत भंडारा जिल्ह्याचे नाव मोठे करण्यासाठी वैनगंगा विद्यालय ( विदर्भ क्रीडा मंडळ पवनी) चा खो-खो संघ सज्ज आहे.