गोंदिया,दि.२०--प्रबल ईच्छाशक्ती, एकाग्रता सर्वसमावेशकतेच्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व पराक्रमात, भारताच्या पहिल्या अँप्युटी जलतरणपटूने शुक्रवारी 11.5 तासांत पाल्क समुद्रधुनी सर करून इतिहास रचला.
वादळ आणि भरतीच्या प्रवाहांना पार करीत थलाईमन्नार (श्रीलंका) पासून ते धनुष्कोडी (भारत) पर्यंत आव्हानात्मक खुल्या पाण्यातून 35 किमी पेक्षा जास्त अंतर पोहून शाश्रुतीने इतिहास घाडवला. एक पाय नसलली व मूळची गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथील शाश्रुती विनायक नाकाडे ही पाल्क समुद्रणुनी (स्ट्रेट) यशस्वीपणे पार करणारी पहिली अँप्युटी जलतरणपटू ठरली. फिशिंग जेट्टी, रामेश्वरम येथून 17 एप्रिल रोजी रात्री 7.50 वाजताच्या सुमारास स्पर्धेला प्रारंभ झाला.
18 एप्रिल रोजी पहाटे 5.50 वाजता, थलाईमन्ना या श्रीलंकेच्या प्रदेशात धनुषकोडी येथे भरती-ओहोटी आणि प्रतिकूल हवामानात शाश्रुतीने 35 किमी पेक्षा अधिक अंतर सर केले. यासाठी तिला 11 तास 5 मिनिटे लागले. तिचे भारतीय सीमाशुल्क, इमिग्रेशन अधिकारी, माध्यम प्रतिनिधी व मान्यवरांनी जोरदार स्वागत केले. यावेळी भारतीय जलतरण महासंघाचे विजयकुमार मयांडी, डॉ. आशेष सैनी उपस्थित होते. शाश्रुतीच्या यशाबद्दल कोहळी समाज मंडळाचे केंद्रीय अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, उपाध्यक्ष अमोल मुंगमोडे, कोहळी समाज गोंदिया जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, गंगाधर परशुरामकर, वंदना किशोर डोंगरवार, प्रकाश गहाणे, रचना गहाणे, हेमराज पुसतोडे, लोकपाल गहाणे, डॉ. अविनाश काशीवार, दिलीप लोदी, डॉ. प्रभाकर गहाणे, विजय कापगते, डॉ. नीलकंठ लंजे आदिंनी कौतुक करून पढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाश्रुतीने बंगालच्या उपसागरात जलतरणाचे प्रशिक्षण घेतले. यासाठी तिला गोस्पोर्ट्स फाउंडेशनने सहकार्य केले. शाश्रुतीने नागपुरातील सेंट झेवियर्स हायस्कूल येथून माध्यमिक, केंद्रीय विद्यालय नाशिक येथून उच्च माध्यमिकम तर सध्या हिस्लॉप कॉलेजला पदवीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी ती जागतिक क्रमवारी ट्रायथलॉनमध्ये 12 व्या क्रमांकावर होती. पॅरालिम्पिक स्पर्धेला ती मुकली. हरियाणातील अर्जुन पुरस्कारप्राप्त प्रशांत कर्माकर यांच्याकडे ती प्रशिक्षण घेत आहे. ती 11 वर्षांपासून या खेळात सक्रीय आहे. 13 वर्षाची असताना भारताचे प्रथम प्रतिनिधित्व केले. तिने आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.