वाशिम, दि. २८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने तसेच खेलो इंडिया व फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत ‘गो-गर्ल्स गो’ या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेचे २९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व्हावी, क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, यादृष्टीने ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच ‘गो गर्ल्स गो’ मोहीमेंतर्गत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ’ या उक्तीस अनुसरून राज्यातील मुलींच्या आरोग्य, तंदुरुस्तीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी, मुलींना क्रीडा विषयक सोयी-सुविधा विषयी माहिती उपलब्ध करून दिल्यास विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता विविध स्तरावर 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर २९ फेब्रुवारी होणाऱ्या स्पर्धेतून गटनिहाय प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या मुलींची ८ मार्च २०२० रोजी बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता निवड करण्यात येणार आहे, असे श्री. शेटीये यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.