सातारा – ट्रॉली वाहत्या कालव्यात पडून कारंडवाडी (ता. सातारा) येथील चार महिलांचा मृत्यू झाला, तर तिघी जण जखमी झाल्या. त्यातील एकीची प्रकृती चिंताजनक आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.शेतातील काम आटोपून घराकडे परतणाऱ्या या महिलांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अरुणा शंकर साळुंखे (वय ५८), उल्का भरत माने (वय ५५), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६५), लीलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०, सर्व रा. कारंडवाडी) अशी मृत महिलांची नावे आहेत.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी सांगितले, की या महिला कारंडवाडी येथे राहण्यास होत्या. त्यांची शेती कारंडवाडी लगतच्या मावटी नावाच्या शिवारात आहे. सकाळी त्या चौघी इतर महिलांसमवेत शेतातील कामे करण्यासाठी गेल्या होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडत असल्याने त्यांचा शेतातील कामे उरकरण्यावर भर होता.सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यानंतर त्यांनी शेतातील काम थांबवले. यानंतर त्या कारंवाडीतील माने नावाच्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून घराकडे परतत होत्या. या वेळी त्यांच्यासोबत इतर तीन महिला देखील होत्या.सात महिला असणारी ट्रॉली घेऊन ट्रॅक्टर कालव्या लगतच्या सेवारस्त्याने कारंडवाडीकडे येत होता. पावसामुळे कालव्यालगतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. या चिखलातून निघालेला ट्रॅक्टर साताऱ्याकडून रहिमतपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर होता.याचदरम्यान ट्रॅक्टर घसरला आणि पाठीमागे असणारी ट्रॉली वाहत्या कालव्यामध्ये पडली. यामुळे ट्रॉलीत असणाऱ्या सातही महिला वाहत्या पाण्यात पडल्या व त्यांच्या अंगावर ट्रॉली उलटी पडली. सर्व महिला त्याखाली दबल्या. यापैकी तीन महिलांना अंगावर पडलेली ट्रॉली आणि वाहत्या पाण्यातून बाहेर पडणे शक्य झाले, तर चार महिला आतमध्ये तशाच दबून राहिल्या.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कारंडवाडीसह कोडोली येथील ग्रामस्थांनी तिकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले. पाण्यात पलटलेली ट्रॉली बाजूला करत बुडालेल्या चार महिलांना कालव्यातून बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.याठिकाणी वैद्यकीय तपासणीअंती चार महिलांना मृत घोषित करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी, तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी उपस्थितांकडून अपघाताची माहिती घेत मदतकार्यासह नातेवाइकांकडे विचारपूस सुरू केली. अपघातात चार महिला मृत झाल्याचे समजल्यानंतर जिल्हा रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती.पोलिसांनी विचारपूस करत मृतांच्या नातेवाइकांना त्याठिकाणी आणले. त्यांनी मृतदेह ओळखत त्यांची नावे पोलिसांना सांगितली. या दुर्घटनेची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. एकाच वेळी गावातील चार महिलांचा मृत्यू झाल्याने कारंडवाडीसह परिसरावर शोककळा पसरली होती.
शेतातून परतताना पावसाने केला घात
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी वर्ग पावसाची वाट पाहात होता. शेतातील मेहनती झाल्यानंतर पेरणीसाठीची जुळणी केल्यानंतर प्रत्येकाला पावसाची आस लागून राहिली होती. वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार शनिवारी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. या महिला ज्या शिवारात गेल्या होत्या, त्यासाठी त्यांना कालव्यालगत असणाऱ्या सेवारस्त्याचा वापर करावा लागत होता.काळवट रान असल्याने, तसेच मध्यंतरी कालव्याच्या सफाईदरम्यान निघालेला गाळ त्याचठिकाणी पसरण्यात आला होता. त्यामुळे पहिल्याच पावसात राडारोडा झाला. या राडारोड्यात ट्रॅक्टर घसरून ट्रॉली कालव्यात पडली.