
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. वांद्रे फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांच्या बाजूने महत्त्वाचा निकाल दिला असून, धनंजय मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.करुणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहोत, असा दावा करत अनेक वर्षे न्यायालयीन लढाई लढली होती. आता या प्रकरणात कोर्टाने त्यांचा दावा मान्य केला आहे.
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचाराचेही आरोप केले होते. त्यांनी या प्रकरणात फॅमिली कोर्टात दाद मागितली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे मान्य केले आहे. यासोबतच, पती-पत्नी वेगळे राहत असल्यास किंवा घटस्फोट झाल्यास पोटगी दिली जावी, असा आदेश देत धनंजय मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये देण्यास सांगितले आहे.
धनंजय मुंडे यांच्यासमोर नवी अडचण
धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय तसेच व्यक्तिगत जीवनातील संकटे वाढत चालली आहेत. करुणा शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते.आता फॅमिली कोर्टाच्या या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी नवी अडचण निर्माण झाली आहे. पुढील काळात घरगुती हिंसाचाराच्या आरोपांबाबत कोर्ट काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.