एकनाथ शिंदेंना धमकी : मुंबई पोलीस रात्रीच बुलढाण्यात धडकले…

0
205

बुलढाणा : उपमुख्यमंत्री तथा शिंदे सेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदेंच्या शासकीय वाहनाला बॉम्बने उडवण्याच्या धमकी देणारे पराक्रमी(!) युवक सिंदखेड राजा मतदारसंघातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. नात्याने मामेभाऊ-आतेभाऊ असलेल्या या युवकांना आज मुंबई पोलिसांनी देऊळगाव राजा (जि. बुलढाणा ) पोलिसांच्या मदतीने देऊळगाव माही येथून अटक केली. अत्यंत काटेकोर गुप्ततेत कारवाई करण्यात आली असली तरी समाज माध्यमाच्या कृपेने ही धक्कादायक घडामोड वादळाच्या वेगाने सर्वत्र पसरली. यामुळे मतदारसंघसाह बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी गुरुवारी मुंबई येथील काही पोलीस ठाणे आणि मंत्रालयाला ‘ईमेल’द्वारे प्राप्त झाली होती. यानंतर लगेच मुंबई पोलीस, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) सतर्क होऊन ‘अॅक्शन मोड’वर आले. गुरुवारी रात्री प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर व देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे व मुंबई एटीएस पथक देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा ) येथे धडकले. दरम्यान धमकीच्या ‘ई-मेल आयडी अॅड्रेस’वरून अभय शिंगणे वय २५ व मंगेश वायाळ यांना देऊळगाव महीमधून ताब्यात घेण्यात आले. दोघा आरोपींना एटीएस पथकाने अटक करून मुंबई येथे नेले.
एटीएस पथकाने अटक केलेल्या अभय शिंगणे याचे देऊळगाव मही येथे मुख्य रस्त्यावर मोबाईल दुरुस्तीचे दुकान असून मंगेश वायाळ हा मालवाहक वाहनाचा (ट्रकचा ) चालक आहे. ई-मेलद्वारे धमकी देणाऱ्या आरोपींची पार्श्वभूमी तपासल्यानंतरच धमकी देण्याचे कारण उघडकीस येणार आहे. मुंबई हादरवून देणाऱ्या या धमकीचे देऊळगाव मही ‘कनेक्शन’ उघडकीस आल्याने तालुका व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल
याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 351(3), 351(4) आणि 353 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कलमांनुसार, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यास किंवा महत्त्वाच्या व्यक्तीला धमकी देणे हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.