रायपूर(वृत्तसंस्था)दि.२१ः- छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेर- नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर आज सकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत ३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. या चकमकीत एक जवान देखील शहीद झाला. जवानांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
२० मार्च रोजी छत्तीसगड पोलिसांना बिजापूर-दंतेवाडा(बस्तर) जिल्ह्याच्या सीमाभागातील गंगलूर जंगल पारिसरात घातपात घडविण्याच्या उद्देश्याने मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली होती. यावरून जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात अभियान राबविले होते. दरम्यान, जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात २६ नक्षलवादी ठार झाले. यात बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला.