1 एप्रिलपासून समृद्धीवर नवे टोलदर लागू, कोणत्या वाहनाला किती टोल भरावा लागणार?

0
191

मुंबई,दि.२१ः- समृद्धी महामार्गाचा उर्वरित भाग अद्याप सुरू झालेला नसताना व मा.न्यायालयाच्या निर्देशानंतरही प्रवाश्याकरींता हव्या त्या सुविधांचा अभाव असतानाही महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) टोलदरात मोठी वाढ जाहीर केली आहे. 1 एप्रिल 2025 पासून ही दरवाढ लागू होणार असून, वाहनचालकांच्या खिशावर याचा थेट परिणाम जाणवणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा शेवटचा टप्पा अजून सुरू व्हायचा आहे. सध्या नागपूर ते इगतपुरीपर्यंत 625 किमीचा टप्पा खुला असून, उर्वरित 76 किमीचा इगतपुरी ते आमने टप्पा एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, पूर्ण मार्ग खुला होण्यापूर्वीच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने टोलमध्ये तब्बल 19 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे.ही दरवाढ 31 मार्च 2028 पर्यंत म्हणजे पुढील तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे. त्यानंतर टोल दरांचा पुन्हा आढावा घेतला जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.

कोणत्या वाहनासाठी किती टोल वाढणार?

कार व हलकी मोटार वाहने:
सध्याचा टोल ₹1080 होता, आता तो वाढून ₹1290 रुपये झाला आहे.

हलकी व्यावसायिक वाहने व मिनीबस:

आधीचा दर ₹1745 होता, आता वाढून ₹2075 रुपये झाला आहे.

बस व दोन आस असलेले ट्रक:
यापूर्वी ₹3655 रुपये लागायचे, आता नव्या दरानुसार ₹4355 रुपये मोजावे लागणार.

अत्यंत जड वाहने (Heavy Vehicles):
आधीचा टोल ₹6980 होता, आता तो ₹8315 रुपये इतका वाढला आहे.

ही दरवाढ लागू झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरील प्रवास पूर्वीच्या तुलनेत अधिक महाग ठरणार आहे. विशेषतः नियमित प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांवर याचा परिणाम अधिक जाणवेल.