छत्तीसगडमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा;सुरक्षा दलाची मोठी कारवाई

0
31
file photo

३ राज्यातील सुरक्षा दलांनी १ हजार नक्षल्यांना घेरले

रायपूर:-छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या कॅरेगुट्टा जंगल भागात मोठी नक्षलविरोधी कारवाई सुरु आहे. या कारवाईत ५ नक्षलवादी ठार झाले आहेत. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाई मानली जात आहे.

कारण यात छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील २० हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यांनी बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगुट्टा जंगल भागात सुमारे १ हजार नक्षलवाद्यांना घेरले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही कारवाई सुमारे ४८ तास सुरू आहे. मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा यांच्यासह प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या हालचालीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. जिल्हा राखीव रक्षक दल (DRG), बस्तर फायटर्स, विशेष टास्क फोर्स (STF), राज्य पोलिसांच्या सर्व तुकड्या, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि त्यांच्या कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ॲक्शन (CoBRA) यांच्यासह विविध तुकड्यांतील सुरक्षा कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले आहेत. नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा भागाला घेरले आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा अड्डा मानला जातो.

काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले होते. त्यातून त्यांनी ग्रामस्थांना डोंगरात प्रवेश न करण्याचा इशारा दिला होता. या भागात मोठ्या प्रमाणात आयईडी पेरण्यात आले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. ३१ मार्च २०२६ पूर्वी देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपवू, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला होता. ही घटना अशावेळी घडली आहे जेव्हा केंद्र सरकारने देशाला ‘नक्षलमुक्त’ करण्याचे ठरवले आहे. “३१ मार्च २०२६ पूर्वी आम्ही देशातून नक्षलवाद पूर्णतः नष्ट करू, जेणेकरून देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षल्यांमुळे आपला जीव गमवावा लागू नये,” असे अमित शाह यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितले होते. यावर्षी छत्तीसगडमधील विविध चकमकींत आतापर्यंत जवळपास १५० नक्षलवाद्यांना मारण्यात आले आहे. त्यात बस्तरमधील १२४ नक्षल्यांचा समावेश आहे. केंद्रानेदेखील झारखंडमध्ये नक्षलवाद्यांवर कारवाई केली. गेल्या आठवड्यात झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले. त्यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या एका वरिष्ठ नक्षली नेत्याचा समावेश होता.