पहलगाम हल्ल्यानंतर संशयित दहशतवादी आसिफ-आदिलचे घर उद्ध्वस्त;सुरक्षा दलाची मोठी कारवाई

0
11

नवी दिल्ली:-पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. पाकिस्तानविरोधात भारताने अनेक कठोर पाऊलं उचलली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी या दोघांचे घर उद्धवस्त करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यात आसिफ शेखचा सहभाग असल्याचा संशय होता. या कारवाईकडे एक मोठी कारवाई म्हणून पाहिले जात आहे. ही घटना त्रालमध्ये घडली. याचे काही फोटोही समोर आले आहेत. संशयित दहशतवाद्याचे घर कसे पाडण्यात आले आहे याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत.

दहशतवादी नेटवर्कविरुद्ध सुरक्षा दलांकडून कारवाई सुरूच आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आसिफ शेख आणि आदिल ठोकर यांचे घर उद्धवस्त करण्यात आले आहेत. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. सुरक्षा दलांना आदिलच्या घरात एक संशयास्पद पेटी सापडली होती. २२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओमध्ये हे दोघेही दिसत होते. या भ्याड हल्ल्यानंतर दोघेही फरार आहेत. हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. ज्यात आसिफ आणि आदिल यांचा समावेश आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. त्राल परिसरातील लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचे घर उडवून देण्यात आले आहे. अनंतनाग पोलिसांनी गुरुवारी आदिलचे रेखाचित्र औपचारिकपणे जारी केले होते. आदिल २०१८ मध्ये पाकिस्तानला गेल्याचे सांगितले जात आहे.

त्याने पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले आणि नंतर काश्मीरला परतला. पहलगाममधील हल्ला करण्यासाठी त्याने परदेशी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. यामुळेच दहशतवाद्यांना बैसरन खोऱ्यात आणले गेले. आसिफ शेख हा दक्षिण काश्मीरचा रहिवासी आहे. त्याचे घरही उडवून देण्यात आले आहे. आसिफ शेखच्या घराची झडती घेत असताना सुरक्षा दलांना एक संशयास्पद बॉक्स सापडला. प्रशासनाने अद्याप या कारवाईबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. पण या कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये दोन्ही दहशतवाद्यांच्या घरांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. फरार दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल सतत मोहीम राबवत आहेत. लोकांना ताब्यात घेऊन चौकशीही केली जात आहे. बैसरण व्हॅली आणि पहलगाम व्यतिरिक्त खोऱ्यातील इतर भागातही दहशतवादविरोधी कारवाया केल्या जात आहेत. शुक्रवारी पहाटे बांदीपोरा भागात चकमक झाली जी अजूनही सुरूच आहे.