कॉमनवेल्थ घोटाळ्यात सुरेश कलमाडी यांना क्लीन चीट

0
21

दिल्ली-2010 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या (Suresh Kalmadi) आयोजनातील कथित घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना अखेर 15 वर्षांनी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारत दिल्ली न्यायालयाने कलमाडी यांना क्लीन चीट दिली. या निर्णयानंतर पुण्यात त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

काय होतं घोटाळ्याचं प्रकरण? :

कॉमनवेल्थ (Commonwealth Scam) स्पर्धांच्या आयोजनावेळी दोन महत्त्वाचे कंत्राट वाटप आणि अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचाराचे आरोप सुरेश कलमाडी, ललित भानोत आणि इतरांवर करण्यात आले होते. त्यानंतर सुरेश कलमाडी यांचे राजकीय करिअर संपल्यासारखे झाले होते. मात्र, तपासात कोणतेही ठोस पुरावे न आढळल्यामुळे आता त्यांच्या नावावरचा डाग साफ झाला आहे.2010 साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप झाला होता. विरोधकांनी हा मुद्दा संसदेत उठवला आणि सीबीआयने चौकशी सुरू केली. या चौकशीनंतर ईडीनेही मनी लॉन्ड्रिंगचा तपास हाती घेतला होता. सीबीआयच्या चौकशीत असे नमूद करण्यात आले की, गेम्स वर्कफोर्स सर्व्हिस आणि गेम्स प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी देण्यात आलेली कंत्राटे चुकीच्या पद्धतीने वाटप झाली होती. यातून सुमारे ३० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, 2014 मध्ये सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल करत पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट केले.

विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी 2025 मध्ये ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला असून, यामुळे सुरेश कलमाडी आणि इतर आरोपींना दिलासा मिळाला आहे. तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या आरोपांमध्ये कोणताही गुन्हेगारी हेतू सिद्ध न झाल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला.