मिसपिर्रीवासियांचा मतदानावर 100 टक्के बहिष्कार
गोंदिया,दि.11ः-जिल्ह्यातील 66-आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील देवरी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मिसपिर्रीच्या नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा मतदानापूर्वीच जिल्हा प्रशासनाला दिला होता. मात्र, त्या गावातील मतदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने आज लोकसभेच्या पहिल्या टप्यासाठी पार पडलेल्या मतदानाच्या वेळी त्यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला. परिणामी, या गावातील बूथ क्र. 309 वरील 1 हजार79 व बूथ क्र 310 वरील 1 हजार 18 मतदार संख्या असलेल्या दोन्ही बूथवर प्रशासनाला मतदानानाची प्रक्रिया पार पाडण्यात अपयश आले आहे.

अतिदुर्गम व १०० टक्के नक्षलग्रस्त असलेल्या गावातील ग्रामपंचायतील ३ नोव्हेंबर २०११ रोजी नक्षल्यांनी आग लावली होती. तेव्हापासून प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे
समस्या वाढतच चालल्या आहेत. ग्रामस्थांच्या मागणीवरून अंगणवाडी शाळेचे दाखल खारीज व आरोग्य विभागाचे नोंदणीनुसार जन्म-मृत्यूचे दस्ताऐवज तयार करून व ग्रामसभेची मंजुरी घेऊन २८ डिसेंबर २0१५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मंत्रालयात पाठविण्यात आले. परंतु, त्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.ज्यामुळे या लोकसभा निवडणुकी वर बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती सरपंच दुरुतसिंग कुंभरे व ग्रामपंचायत सदस्य प्रमिला पंधरे यांनी दिली आहे.समस्या निकाली न निघाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
