अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील केंद्रीय मूल्यांकन विभागात झालेल्या गुणवाढ प्रकरणात गुरुवारी रात्री १0.३0 वाजता एनएसयूआयचा शहराध्यक्ष संकेत कुलट याला पोलिसांनी अटक केली. त्याने उत्तरपत्रिकेत चार गुणांचे ४७ गुण केल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे.
गुणवाढ प्रकरणात २१ मार्च रोजी संकेत कुलटसह नऊ आरोपींविरोधात भादंवि कलम ४६८,४७१(३४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून संकेत पसार होता. आतापर्यंत अनुराग ढोले, रोशन वाकोडे, योगेश पासरे, मुकेश वानखडे, राहुल वानखडे, संजय देशमुख, शिवशंकर बावस्कर व शेखर पुतळे या आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गुरुवारी रात्री संकेत कुलटला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संकेत हा एनएसयुआयचा शहराध्यक्ष असून त्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर द्वितीय वर्षांच्या पेपरमध्ये चार गुण प्राप्त झाले होते. त्याने केंद्रीय मूल्यांकन विभागातील अधिकारी व एजन्टमार्फत उत्तरपत्रिकेत खोडतोड करुन चार गुणांचे ४७ गुण केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे.
संकेतने कोणत्या अधिकार्यामार्फत गुणवाढ केली तसेच त्याने किती पैसे दिले याची सखोल चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. शुक्रवारी संकेतसह अन्य आठही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामध्ये संजय देशमुख, शेखर पुतळे, शिवशंकर बावस्कर व संकेत कुलट या चौघांनाही ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच अन्य पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिसांनी अधिकारी, विद्यार्थी व एंजन्ट यांचे कॉल रेकॉर्डिंग, बँकेतील पैसे व स्वाक्षरीची माहिती गोळा केली आहे. फॉरेन्सिक लॅबकडून हस्ताक्षरे तपासून पुरावे गोळा करण्यात येत आहेत.