पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांचा जाहीर सत्कार

0
78

शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सवाबाबत सूचना   

तिरोडा, दि.26 : पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी अतिशय गुंतागुंतीची प्रकरणे यशस्वीरित्या हाताळलेली आहेत. ते जागृती पतसंस्थेमधील अपहार प्रकरण असो की चुरडी येथील तिहेरी हत्याकांड व आत्महत्या प्रकरण असो. त्यांनी अवैध व्यवसायाविरुद्ध केलेल्या धडक कारवाया सर्वांना माहीतच आहेत. त्यातच कोविड-19 चे संकट आणि सध्याची पूर परिस्थिती हाताळणे अशा अनेक कामात त्यांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे. उल्लेखनीय कामगिरी करून त्यांनी नागरिकांमध्ये एक वेगळा ठसा निर्माण करून पोलीस प्रशासनाबद्दल त्यांनी जनतेमध्ये विश्वास निर्माण केला आहे. त्यांनी तिरोडा परिसरातील नागरिक व पोलीस पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळे ते या कार्यात यशस्वी झाले, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले. (जाहीर सत्कार)

तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी हे 31 ऑगस्ट 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने तिरोडा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने झरारिया सभागृह तिरोडा येथे जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस अधीक्षक बोलत होते.

सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, तालुका पत्रकार संघ, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समिती, मुस्लिम कमेटीचे  पदाधिकारी, श्री गुरुनानक क्रीडा मंडळ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तिरोडा शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम, पंसचे विस्तार अधिकारी शितेश पटले, विद्युत वितरणाचे कनिष्ठ अभियंता मेश्राम, नगर परिषदेचे अधिकारी, पोलीस स्टेशन तिरोडा येथील सपोनि ईश्वर हनवते, अभिजीत जोगदंड, सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते. याप्रसंगी तालुका पत्रकार संघानेही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला व भावी आयुष्याबाबत अभिष्ठ चिंतन केले.

जाहीर सत्कार
मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, उपस्थित वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम, विस्तार अधिकारी शितेश पटले व इतर

याप्रसंगी पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मातोश्री कौतिकाबाई लक्ष्मण पारधी ह्या आवर्जून उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त पोलीस पाटील विठोबा ठाकरे, परदेशीं ठाकरे, कुंडलिक दखने, प्रेमलाल अटराहे, वामनराव बांते, सेवानिवृत्त होणारे छत्रपाल पटले, महिला तक्रार केंद्राचे दिनेश कवाडकर यांचा सत्कार करण्यात आला.

गणेशोत्सवाबाबत सूचना

सत्कार समारंभापूर्वी शांतता समितीची बैठक झाली. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी गणेशोत्सवाबाबत उपस्थितांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. तसेच काही सूचना उपस्थित पत्रकार, विविध संघटनांचे पदाधिकारी, पोलीस पाटील यांच्याकडूनही मागविण्यात आल्या.

जाहीर सत्कार
उपस्थित तालुक्यातील पोलीस पाटील, शांतता समिती, विविध सघटनांचे पदाधिकारी व नागरिक

यात पोलीस निरीक्षक पारधी म्हणाले की, शासनाने सण-उत्सव धडाक्यात साजरे करण्याचे जाहीर केले आहे. ते साजरे करू, पण कोविड संपलेला नाही. काही रुग्ण आढळतच आहेत. मागील दोन वर्षे आपण कोविडचे नियम पाळत हे सण साजरे केलेत. उत्सव साजरे करताना हे नियम लक्षात घ्यावे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करून घ्यावी. शासनाने डीजे वाजविण्यास परवानगी दिली नाही, ही बाब सुद्धा लक्षात घ्यावी. मंडपात रोषणाईसाठी विद्युत कंपनीच्या कार्यालयातून रीतसर परवानगी घ्यावी. मूर्ति विटंबनेची प्रकरणे घडू नयेत यासाठी मंडपात 24 तास वेळेनुसार दोन व्यक्तींची उपस्थिती अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात त्रास होवू नये, याची सुद्धा मंडळांनी दक्षता घ्यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी दिल्या.