गोंदिया, दि.24 : जिल्ह्यातील बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग गोंदिया अंतर्गत शिरपूर, कालिसराड व पुजारीटोला (बाघ संयुक्त प्रकल्प) व इटियाडोह हे चार मोठे प्रकल्प येतात. बाघ संयुक्त प्रकल्प अंतर्गत 16 मे 2024 रोजी 32.98 द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी नियोजनाप्रमाणे 17.00 द.ल.घ.मी. पुढील वर्षासाठी राखीव, 10.00 द.ल.घ.मी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत गोंदिया जिल्ह्यासाठी आकस्मिक आरक्षण, 4.24 द.ल.घ.मी. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमार्फत आरक्षीत वजा जाता 1.74 द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे. सन 2023-24 उन्हाळी हंगामाचे सिंचन पूर्ण झाले असून सिंचनाकरीता पाण्याची गरज संपुष्टात आली आहे, त्यामुळे नियोजनाप्रमाणे पाण्याचा वापर झाला असून मुबलक प्रमाणात आरक्षीत केल्याप्रमाणे जलाशयात पाणीसाठा उपलब्ध आहे.
तसेच इडियाडोह प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा 83.60 द.ल.घ.मी. उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणीसाठ्यातून 5.00 द.ल.घ.मी. पाणी जिल्हा परिषद भंडारा साठी आकस्मिक आरक्षीत, 3.072 द.ल.घ.मी. ग्रामीण पाणी पुरवठा आरक्षीत व 25.00 द.ल.घ.मी. पाणी झाशीनगर उपसा सिंचन योजनेकरीता आरक्षीत केलेले पाणी वजा जाता 50.53 द.ल.घ.मी. पाणी जलाशयात शिल्लक आहे. 2023-24 उन्हाळी सिंचन पूर्ण झाले असून सिंचनाची गरज संपुष्टात आली आहे, त्यामुळे नियोजनाप्रमाणे पाण्याचा वापर झाला असून मुबलक प्रमाणात आरक्षीत केल्याप्रमाणे जलाशयात पाणीसाठा उपलब्ध आहे.
आरक्षित पाणी पुरवठा योजनांना नियमीत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच आकस्मिक पाणी आरक्षण करणाऱ्या यंत्रणेनी पाण्याची मागणी केल्यास पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असून पाण्याची टंचाई आढळून येत नाही, अशी माहिती बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राज कुरेकार यांनी दिली आहे