मतदारांना सी-व्हिजील ॲपद्वारे तक्रारी नोंदवण्याचे अनिल कुमार झा यांचे आवाहन
वाशिम, दि ५ नोव्हेंबर-सामान्य निवडणूक निरीक्षक अनिल कुमार झा यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे नमूद केले. स्वच्छ व पारदर्शक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने निरिक्षकांची नियुक्ती केली असून, आदर्श आचारसंहितेचे पालन करून निवडणुका यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. खर्च निरिक्षक श्रीकृष्ण मूर्ती यांनी प्रत्येक उमेदवारासाठी ४० लाख रुपये खर्च मर्यादा असल्याचे स्पष्ट केले आणि प्रचारातील सर्व खर्चाची नोंद देण्याचे आवाहन उमेदवारांचे प्रतिनिधी आणि पक्ष प्रतिनिधींना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आज सर्व नोडल अधिकारी, निवडणुकीशी संबंधित अधिकारी, आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत सामान्य निवडणूक निरीक्षक अनिल कुमार झा, पोलीस निवडणूक निरीक्षक अल्ताफ अहमद खान, खर्च निरिक्षक श्रीकृष्ण मूर्ती, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस , अप्पर जिल्हादंडाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, आचारसंहिता नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब दराडे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अभिनव बालूरे , मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ शिक्षण अधिकारी (योजना) गजानन डाबेराव आणि इतर निवडणुकीशी संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी आणि निवडणुकीशी संबंधित कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे सांगितले तसेच निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जाहीर केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके यांनी उपस्थितांना आदर्श आचारसंहिता आणि निवडणुकीचे नियम समजावून दिले. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. निवडणूक काळात जबाबदाऱ्या असलेल्या अधिकाऱ्यांना सजगपणे काम करण्याचे निर्देशही दिले.
निवडणूक निरीक्षक अनिल कुमार झा यांनी मतदारांना सी-व्हिजील ॲप आणि १९५० या टोल फ्री मदत केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या ॲपद्वारे मतदार तक्रारी नोंदवू शकतात तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती मिळवू शकतात.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम, आणि कारंजा या तीनही मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ४ नोव्हेंबर तारखेला नामनिर्देशन पत्र परत घेण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण ६२ उमेदवार सहभागी होणार आहेत. मतदारांनी निश्चित होऊन निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. जाहिरातींसाठी प्रमाणपत्र घेण्यासंदर्भात एमसीएमसी समिती आणि आदर्श आचारसंहिता कक्षा कडून आवश्यक परवानगी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.